Vadgaon Maval News : उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींचा आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते सत्कार

एमपीसी न्यूज – ‘महा आवास अभियान-ग्रामीण’ अंतर्गत घरकुल योजना राबवली जात आहे. मावळ तालुक्यात होणाऱ्या घरकुलाच्या प्रतिकृतीचे (डेमो हाऊस) उद्घाटन मावळ पंचायत समिती आवारात आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मावळ पंचायत समितीच्या वतीने महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींचा आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी प्रत्येकी दहा लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणाही त्यांनी केली. 

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध योजना गतिमान करण्याच्या उद्देशाने येथील पंचायत समितीच्या सभागृहात आमदार शेळके यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. सभापती ज्योती शिंदे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, सुवर्णा कुंभार, शांताराम कदम, साहेबराव कारके, महादू उघडे,गटविकास अधिकारी सुधीर भागवत,नामदेव पोटफोडे,अंकुश आंबेकर,विस्तार अधिकारी शुभांगी भूमकर आदी उपस्थित होते.

पंचायत समितीच्या आवारात प्रायोगिक तत्त्वावर (डेमो) उभारण्यात आलेल्या घरकुलाचे उदघाटन आमदार शेळके यांच्या हस्ते झाले.महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींचा तालुका स्तरावरील  पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. त्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत टाकवे बुद्रक(13 घरकुले), औंढे (सहा), करूंज (पाच), राज्य योजनेंतर्गत माळेगाव ,बुद्रूक (20 घरकुले), कशाळ(नऊ), करंजगाव (आठ) या ग्रामपंचायतींनी पुरस्कार पटकावला.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्वोत्कृष्ट घरकुलमध्ये येळसे येथील दिलीप कालेकर यांनी प्रथम,औंढे येथील लक्ष्मण वाघमारे यांनी द्वितीय तर टाकवे बुद्रुक येथील मंदा वाघमारे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. राज्य योजनेतंर्गत सर्वोत्कृष्ट घरकुलमध्ये सावळा येथील मच्छिंद्र गोटे यांनी प्रथम, कशाळ येथील सुरेश मदगे यांनी द्वितीय तर सोमाटणे येथील शुभम गायकवाड यांनी तृतीय क्रमांक पटकावला.केंद्र योजनेंतर्गत सर्वोत्कृष्ट क्लस्टरचा पुरस्कार महागाव क्लस्टरने तर राज्य योजनेंतर्गत टाकवे बुद्रूक क्लस्टरने पटकावला.

महा आवास योजनेत मावळ तालुका पुणे जिल्हात अव्वल स्थानावर असल्याबद्दल आमदार शेळके यांनी कौतुक केले. ज्या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध नाही,त्यांना शासनस्तरावर जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन दिले.

माजी सभापती,विद्यमान सदस्य गुलाबराव म्हाळसकर यांनी ठोकळवाडी धरणात जलपर्यटन व स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी लॉंच उपलब्ध करून देण्याची मागणी केली. पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांच्या रिक्त असलेल्या जागा त्वरित भराव्यात व घरकुलांसाठी गायरानातील जागा उपलब्ध करून द्याव्यात,अशी मागणी म्हाळसकर व सभापती ज्योती शिंदे यांनी केली.

मान्यवरांच्या हस्ते महाआवास अभियान ग्रामीण टप्पा-2 शंभर दिवसांच्या उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले. गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांनी प्रास्ताविक केले. रामराव जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले. सभापती ज्योती शिंदे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.