Pune News : एक फेसबुक पोस्ट अन् मृत्यूशी झुंज देणाऱ्या चेतनच्या उपचारासाठी 14 लाख रुपये जमा 

एमपीसी न्यूज : पुण्याच्या मुंढवा परिसरातील रस्त्यावरून पायी जात असताना अचानकपणे वरून पडलेली एक लोखंडी सळई थेट बारा वर्षीय चेतन महेश गाढवे या मुलाच्या डोक्यात घुसली. या घटनेत हा मुलगा गंभीर जखमी झाला होता. कुटुंबीयांनी त्याला पुण्यातीलच नोबल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचाराचा खर्च मोठा होता. मुलाची घरची परिस्थिती जेमतेमच.. अशात उपचाराचा खर्च कसा करणार हा प्रश्न पडला असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे देवदूत सारखे धावून आले..

28 डिसेंबर रोजी बारा वर्षीय चेतन दुपारी एक वाजता रस्त्याने पायी जात होता. तेथीलच एका इमारतीवर केबल ओढण्याचे काम सुरू होते. काही समजण्याच्या आतच वरून आलेली एक लोखंडी सळई थेट त्याच्या डोक्यात घुसली. यामध्ये काही क्षण तो खाली कोसळला आणि जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. परंतु जखम खोलवर झाल्याने त्याच्यावर ऑपरेशन करणे गरजेचे होते. त्यासाठी खर्चही लागणार होता. परंतु चेतनच्या कुटुंबाची परिस्थिती जेमतेम असल्याने ऑपरेशन लांबणीवर पडले होते. ती माहिती मनसेचे पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे यांना मिळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. आणि अधिकाधिक नागरिकांनी चेतनच्या वडिलांना मदत करावी यासाठी आपल्या फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट लिहिली होती.

वसंत मोरे यांनी ही फेसबुक पोस्ट लिहिताच चेतन गाढवेच्या वडिलांच्या अकाउंटवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पैसे पाठवले आणि एका दिवसात तब्बल 14 लाख रुपये जमा झाले. वसंत मोरे यांनी स्वतः आपल्या फेसबुक अकाउंट करून ही माहिती दिली. मुलाच्या उपचारासाठी एका दिवसात पैसे जमा झाल्याने चेतनच्या वडिलांनी वसंत मोरे यांचे आभार मानले.

आभार मानताना चेतनचे वडील म्हणाले, ” मला महाराष्ट्र नवनिर्माण सेना माहित आहे, पण हा देव माणूस माहीत नव्हता. मी या देव माणसाला आयुष्यभर कधीच विसरणार नाही. या दुनियेत कुणी कुणाला दोन रुपये सुद्धा देत नाही, पण या देवाच्या एका शब्दामुळे उपचारासाठी बारा लाख रुपये जमा झाले” असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते..

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.