Maval News : खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते मावळातील विविध गावातील अंतर्गत रस्त्यांची कामे सुरु

एमपीसी न्यूज – खासदार निधी बंद झाला असतानाही पुणे जिल्हा नियोजन समितीतून निधी मिळवून शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ तालुक्यात विकास कामांचा सपाटा सुरूच ठेवला आहे. मावळ तालुक्यासाठी मिळालेल्या विकास निधीमधून दारूंब्रे, कुसगांव, चांदखेड, शिवणे, औझर्डे या गावातील अंतर्गत रस्त्यांच्या 65 लाखांच्या कामांचे आज (मंगळवारी) खासदार बारणे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या रस्त्यांमुळे गावक-यांची ये-जा करण्याची चांगली सोय होणार आहे.

तहसीलदार मधूसुदन बर्गे, शिवसेना तालुका प्रमुख राजेश खांडभोर, महिला संघटिका शैलजा खंडागळे, भारत ठाकूर, शांताराम भोते, चंद्रकांत भोते, रामभाऊ सावंत, मदन शेडगे, गावचे सरपंच यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, कोरोनाच्या कालावधीत केंद्र सरकारने खासदार निधी बंद केला. त्यामुळे मतदारसंघातील विकासकामांवर परिणाम होत होता. अशा परिस्थितीत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने खासदारांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन दिला. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी जिल्हा नियोजन समितीतून मिळालेल्या निधीतून विकास कामे सुरु ठेवली. कामांना ब्रेक लागू दिला नाही.

मावळ तालुका मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे. कमी लोकवस्ती असलेली गावे आहेत. या गावांमधील अंतर्गत रस्ते पक्के नाहीत. त्यामुळे नागरिकांचे हाल होत होते. मावळातील दारूंब्रे, कुसगांव, चांदखेड, शिवणे, औझर्डे या गावातील अंतर्गत रस्त्यांच्या 65 लाखांच्या कामांचे भूमीपूजन झाले. रस्त्याचे काम जलदगतीने पूर्ण करावे. रस्ता नागरिकांसाठी लवकरात-लवकर सुरु करावा अशा सूचना त्यांनी दिल्या. मावळातील विविध गावातील अंतर्गत रस्ते, समाजमंदिरे, छोटे पुल उभारणे अशी कामे केली आहेत. मावळ तालुक्यात यापूर्वीही सर्वाधिक निधी दिल्याचे खासदार बारणे यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.