Mumbai News : फोन टॅपिंग प्रकरणात राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना; तीन महिन्यात अहवाल देण्याचे आदेश

एमपीसी न्यूज – लोकप्रतिनिधींचे फोन टॅपिंग केल्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने उच्च स्तरीय समितीची स्थापना केली आहे. तसेच या समितीला तीन महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबतचा आदेश राज्य शासनाच्या गृह विभागाने शुक्रवारी (दि. 9) दिला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या द्वितीय पावसाळी अधिवेशनामध्ये सहा जुलै रोजी विधानसभेत चर्चेच्या वेळी आमदार नाना पटोले यांनी लोकप्रतिनिधींचे दूरध्वनी गैर पद्धतीने टॅप केल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर उत्तर देताना गृहमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल आणि त्यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल. तसेच याबाबतची सर्व वस्तुस्थिती पुढील अधिवेशनात मांडण्यात येईल, असे आश्वासन दिले होते.

यानंतर राज्य शासनाने आता फोन टॅपिंग प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. ही समिती त्रिसदस्यीय असणार आहे. समितीचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक असून राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त मुंबई आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त (विशेष शाखा) मुंबई हे सदस्य असणार आहेत.

ही समिती सन 2015 ते सन 2019 या पाच वर्षांच्या काळातील फोन टॅपिंग प्रकरणाची पडताळणी करून या कालावधीमध्ये अनिष्ट राजकीय हेतूने लोकप्रतिनिधींचे फोन गैरपद्धतीने टॅप करण्यात आले आहेत का, याबाबतची सखोल चौकशी करणार आहे.

समितीने चौकशीची कार्यवाही पूर्ण करून तीन महिन्यात त्यांचा अहवाल शासनाला सादर करावे, असे आदेशात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.