Mumbai: महाविकास आघाडीतील तिढा सुटला, विधान परिषदेची एकच जागा लढविण्यास काँग्रेस तयार

Mumbai: The Congress is ready to fight for a single seat in the Legislative Council, The problem in the Mahavikas Aghadi has been solved

एमपीसी न्यूज – महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या रविवारी रात्री झालेल्या बैठकीत विधानपरिषद निवडणुकीतील तिढा अखेर सुटला आहे. विधानसभेच्या 9 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसने दोन उमेदवार दिल्याने महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण झाला होता, मात्र काँग्रेसने एकच जागा लढवण्यास तयारी दाखवल्याने आता महाविकास आघाडी पाच जागांवर निवडणूक लढवणार आहे. यामुळे विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे.

महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, महाविकास आघाडीने सहा जागा लढवाव्या ही काँग्रेसची अपेक्षा होती. मात्र निवडणूक घेणे सध्याच्या कोरोनाच्या संकटाच्या परिस्थितीत अवघड आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनंती केली की निवडणूक बिनविरोध करु. या सगळ्या गोष्टींचा विचार करुन महाविकास आघाडी पाच जागा लढणार आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.

कोरोनाचं संकट नसते तर निवडणूक घेणे शक्य होते, मात्र सध्या सर्व आमदारांना मुंबईत आणणे आणि निवडणूक घेणे कठीण आहे. संख्याबळ पाहता काँग्रेसला कमी बाजू आली आहे, मात्र मुख्यमंत्र्यांची विनंती आणि कोरोनाचं संकट पाहून आम्ही हा निर्णय घेतला आहे, असे महसूलमंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like