Mumbai : गावी जाण्यासाठी परराज्यातील हजारो मजुरांचा वांद्रे स्थानकासमोर ठिय्या

एमपीसी न्यूज : देशभरात लॉकडाऊनमध्ये वाढ केल्याचे तीव्र पडसाद आज ( सोमवारी ) मुंबईत उमटले. परराज्यातील हजारो मजुरांनी थेट वांद्रे स्टेशनबाहेर धडक देत स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन केले. आम्हाला आमच्या गावाला जाण्याची परवानगी द्या, अशी मागणी या मजुरांनी केली. दरम्यान, गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. तसेच तेथे अतिरिक्त कुमकही मागविण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी देशाला संबोधित करताना लॉकडाऊन आणखी १९ दिवसांसाठी म्हणजेच ३ मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली. करोनाचा वाढता प्रादुर्भाव तसेच सर्व राज्यांची मते लक्षात घेऊन पंतप्रधानांनी हा निर्णय घेतला. ही घोषणा झाल्यानंतर सायंकाळी साडेचारच्या सुमारास मुंबई तील वांद्रे रेल्वे स्थानकासमोर त्याचे पडसाद उमटले. आपल्या मूळ गावी जाण्यासाठी वांद्रे स्टेशनबाहेर हजारो मजुरांनी अचानक धडक दिली.

यावेळी उपस्थित मजुरांनी स्थानकासमोर ठिय्या देत आम्हाला गावी जाण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली. सुमारे दीड तास या मजुरांचे ठिय्या आंदोलन सुरू होते. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला. दरम्यान, पोलिसांनी या मजुरांची समजूत काढत राज्य सरकार तुमची सर्व व्यवस्था करत आहे, असे सांगत गर्दी पांगविण्यावर नियंत्रण मिळवले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.