Pimpri News : महापालिका प्रभाग रचनेत फेरबदल?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या प्रभाग रचनेचा कच्च्या प्रारुप आराखड्यात राज्य निवडणूक आयोगाने काही बदल सुचविल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानुसार बदल करण्यात येत असून अधिकारी मुंबईत तळ ठोकून आहेत. काहींना अनुकूल अशी प्रभाग रचना केल्याचे आरोप होत होते तसेच आराखडा तयार करण्यासाठीची समिती केवळ नावालाच होती. चारच अधिका-यांनी प्रभाग रचना केल्याची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात आहे.

महापालिका प्रशासन निवडणूक आयोगाने दिलेल्या 30 नोव्हेंबरच्या मुदतीत आराखडा तयार करु शकले नव्हते. प्रशासनाने आराखड्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ मागितली होती. आयोगाने 6 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. महापालिकेची 2022 ची निवडणूक तीन सदस्यांचा एक प्रभाग या पद्धतीने होणार आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाने आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा प्रारुप आराखडा तयार केला. निवडणूक विभागाने तो आराखडा सोमवारी (दि.6) राज्य निवडणूक आयोगाला सादर केला होता.

राज्य निवडणूक आयोगासमोर शनिवारी (दि.4) आराखड्याचे सादरीकरण ठेवले होते. त्यासाठी महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त मुंबईला गेले होते. आयोगाकडून काटेकोरपणे आराखड्याची तपासणी करण्यात आली. प्रभागात लोकसंख्या योग्य प्रमाणात आहे का?, नैसर्गिक प्रवाह, रस्ते, उड्डाणपूल सीमा मानून रचना केली आहे का ? याची तपासणी केली. त्यात आयोगाने काही बदल सुचविल्याचे समजते. अतिरिक्त आयुक्त, निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त मुंबईतच तळ ठोकून आहेत. आयोगाने सुचविलेले बदल केले आहेत. त्यामुळे प्रभाग रचनेत फेरफार झाला आहे.

प्रभाग रचनेसाठी 25 जणांची नेमलेली समिती केवळ नावालाच होती. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि दोन सहाय्यक आयुक्त या चार जणांनीच आराखडा तयार केल्याची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात आहे. काहींना अनुकूल असा आराखडा तयार केल्याचा आरोप होत आहे. त्यातच आयोगाने बदल सुचविल्याने या आरोपाला पुष्टी मिळत आहे. तसेच प्रशासनाच्या गोपनीयतेचा दावाही फोल ठरत आहे. दरम्यान, याबाबत प्रतिक्रियेसाठी वारंवार संपर्क साधला असता अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी प्रतिसाद दिला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.