Maval News : टाकवे बुद्रुक विविध कार्यकारी सोसायटीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अंकुश आंबेकर व जितेंद्र परदेशी बिनविरोध

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीची चुरस सध्या सुरू आहे. सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अंकुश रामचंद्र आंबेकर व जितेंद्र काशिनाथ परदेशी यांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित 11 जागांसाठी 27 उमेदवार रिंगणात आहेत.

मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 13 जागांची ही निवडणूक असून निवडणूक लढविण्यासाठी 52 इच्छुकांनी नामनिर्देशन केले. त्यातील 11 जणांचे नामनिर्देशन नामंजूर करण्यात आले.

मंगळवारी (दि. 24 मे) या निवडणुकीतून अर्ज माघारी घेण्याचा दिवस होता. त्यात 14 इच्छुक उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. दरम्यान सोसायटीत एक जागा अनुसूचित जाती, जमाती (एस सी) आणि एक जागा भटक्या जमाती, विमुक्त जाती/जमाती/ विशेष मागास प्रवर्गासाठी (इन टी) राखीव आहेत. या प्रवर्गातून अंकुश आंबेकर व जितेंद्र परदेशी यांचेच अर्ज राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली असून उर्वरित 11 जागासांठीची निवडणूक 3 जून रोजी होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राकेश निखारे यांनी काम पाहिले.

आता टाकवे बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत 11 जागांसाठी 27 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात 19 सर्वसाधारण कर्जदार, 6 महिला प्रतिनिधी आणि 2 इतर मागास वर्गाच्या उमेदवारांचा समावेश आहे. 13 जागांमध्ये सर्वसाधारण कर्जदार 8 जागा, महिला प्रतिनिधी 2 जागा, इतर मागासवर्ग 1 जागा, एस टी  1 जागा, एन टी 1 जागा असे आरक्षण आहे.

बिनविरोध निवड झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अंकुश आंबेकर यांनी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक व मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघाच्या अध्यपदाची धुराही ते यशस्वीपणे सांभाळत आहेत. पुणे जिल्हा सहकारी बोर्ड सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत. टाकवे बुद्रुक विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्षपद भूषविले असून तालुक्यातील डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. एकूणच सहकार क्षेत्रात गेल्या 25 वर्षापासून आंबेकर कार्यरत असल्याने सहकार क्षेत्रावर त्यांची चांगलीच पकड आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.