Hinjawadi News : लघुशंकेसाठी थांबलेल्या दुचाकीस्वाराला चाकूचा धाक दाखवून लुटले

एमपीसी न्यूज – मुबईहून पुण्याला दुचाकीने येत असताना हिंजवडी परिसरात लघुशंकेसाठी थांबलेल्या एका दुचाकीस्वाराला दोघांनी चाकूचा धाक दाखवून लुटले. ही घटना मंगळवारी (दि. 24) पहाटे पावणे पाच ते पावणे सात वाजताच्या सुमारास घडली.

विशाल दिनकर पांगारकर (वय 39, रा. बालाजीनगर, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एक अनोळखी पुरुष आणि महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मंगळवारी पहाटे मुंबईहून पुण्याला दुचाकीने येत होते. पहाटे पावणे पाच वाजताच्या सुमारास पुणे-मुंबई महामार्गावर हिंजवडी येथे ते लघुशंकेसाठी थांबले. त्यावेळी एका दुचाकीवरून दोघेजण आले. त्यातील पुरुषाने फिर्यादी यांच्या गळ्याला चाकू लावून 19 हजार 499 रुपये किमतीचा मोबाईल फोन काढून घेतला.

आरोपी महिलेने फिर्यादी यांना पाठीमागून धरून गुडघ्यावर बसवून अनोळखी पुरुषाने फिर्यादी यांच्या गळ्यातील दोन लाख तीन हजार 690 रुपये किमतीची 58.790 ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या चेन जबरदस्तीने काढून चोरून नेल्या. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.