Omicron News : धाकधुक वाढली! देशभरात ओमायक्रोनचे 422 रुग्ण; सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात

एमपीसी न्यूज – ओमायक्रोनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत संपुर्ण देशभरात 422 रुग्णांची नोंद करण्यात आली असून त्यातील सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत. त्यापैकी 130 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.  ओमायक्रोनचा वाढता धोका लक्षात घेत याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. 

या नव्या व्हेरीयंटची सर्वाधिक नोंद महाराष्ट्रात करण्यात आली असून आतापर्यंत 108 ओमायक्रोन रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रानंतर इतर राज्यांमध्ये सुद्धा ही रुग्णसंख्या हळूहळू वाढत असल्याचे चित्र आहे. दिल्ली येथे 79, गुजरात 43 आणि तेलंगणा येथे 41 रुग्णांची आतापर्यंत नोंद झाली आहे.

ओमायक्रोनचा वाढता धोका लक्षात घेत नुकतंच केंद्र सरकारने कोविड लसीकरणाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. यामध्ये आरोग्य सेवक, फ्रंटलाईन वर्कर आणि 60 वर्षांवरील लोकांसाठी बुस्टर डोस 10 जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. शिवाय लहान मुलांच्या लसीकरणाचा मार्ग सुद्धा मोकळा करण्यात आला असून 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटोतील मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

नव्या व्हेरीयंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून नवी नियमावली जारी करण्यात आली असून प्रत्येकाने योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.