Bhosari Crime News : महापालिका शाळेचा बनावट दाखला देणा-यास अटक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेच्या नावाने बनावट शाळा सोडल्याचा दाखला देणा-यास भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 28) दुपारी कासारवाडी रेल्वे स्टेशनच्या मागे करण्यात आली.

राहुल विश्वम्भर शिंदे (वय 41, रा. आनंदनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई प्रभाकर खाडे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फसवणूक करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महापालिका पिंपळे निलख मुले व मुली शाळा क्रमांक 52 या शाळेचा शाळा सोडल्याचा बनावट दाखला तयार केला. त्यावर शिक्के मारून खोटी सही करून दिली.

हा प्रकार पोलिसांना माहिती झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करून राहुल शिंदे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून शाळेचे शिक्के, शाळेचे कोरे दाखले, 600 रुपये रोख रक्कम आणि एक हजारांचा एक मोबाईल फोन पोलिसांनी हस्तगत केला आहे.

आरोपी राहुल शिंदे याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 465, 466, 468, 473, 474, 420 नुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.