Talegaon Dabhade News : इंद्रायणी महाविद्यालयात राष्ट्रीय वाचन दिनानिमित्ताने ऑनलाईन व्याख्यान संपन्न  

एमपीसी न्यूज – इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय वाचन दिनानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. मराठीतील ज्येष्ठ कवी श्री उद्धव कानडे यांचे ‘वाचन संस्कृती व साहित्य व्यवहार’ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.  

कला, वाणिज्य, विज्ञान ,बीबीए बीसीए व तंत्रशिक्षण विभाग या विभागातील दीडशेहून अधिक प्राध्यापक, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी सदर व्याख्यानाचा लाभ घेतला.

याप्रसंगी बोलताना कविवर्य उद्धव कानडे म्हणाले की, माणसाची उन्नती व्हायची असेल तर वाचन संस्कृतीत वाढ झाली पाहिजे, आपले जीवन समृद्ध करायचे असेल तर चांगली पुस्तके वाचली पाहिजेत. पुस्तक हेच जीवन जगण्याचे प्रभावी साधन आहे.आज तरुण वर्ग पुस्तके वाचताना दिसत नाही, केवळ मोबाईलमध्ये अडकलेली आजची पिढी पुन्हा एकदा पुस्तकांकडे वळली तरच राष्ट्राला उज्ज्वल भवितव्य राहील.  असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले, शाहू महाराज,स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, साने गुरुजी तसेच मराठीमधील कुसुमाग्रज, तळेगाव मधील लेखक गो .नी .दांडेकर, बालकवी अशा अनेक विद्वानांनी आपल्या लेखनामधून समाज समृद्ध केला आहे. आजच्या पिढीने पुरोगामी महाराष्ट्रातील सर्वच विचारवंतांचे – लेखक कवींचे विचार वाचून ते प्रत्यक्ष आत्मसात करण्याची गरज असल्याचे कानडे यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे हे होते. त्यांनी देखील याप्रसंगी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. विजयकुमार खंदारे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. संदीप कांबळे यांनी मानले.

राष्ट्रीय वाचन दिनानिमित्ताने इंद्रायणी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी एक हजार पुस्तके याप्रसंगी ग्रंथालयाला देण्यात आली. वाचन दिनाच्या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, उपाध्यक्ष  गोरखनाथ  काळोखे,  डॉ.दीपक शहा, सचिव चंद्रकांत शेटे, खजिनदार शैलेश शहा, विश्वस्त विलास काळोखे ,संदीप काकडे ,निरुपा कानिटकर, गणेश भेगडे, गणेश खांडगे आदी मान्यवरांनी वाचन दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.