Pavana Dam: धरणात केवळ 17.79 टक्के पाणी, मोठ्या प्रमाणात पाणी कपात करा, पाटबंधारे विभागाची महापालिकेला सूचना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची तहान भागविणा-या पवना धरणात (Pavana Dam) आजमितीला केवळ 17.79 टक्के पाणीसाठा आहे. धरणातील सध्याचा पाणीसाठा, सद्यस्थितील पर्जन्यमान याबाबी विचारात घेऊन महापालिकेने दैनंदिन पाणीवापर अत्यंत काटकसरीने करावा. दैनंदिन पाणीवापर असाच सुरु राहिल्यास आणि पाऊस लांबणीवर गेल्यास तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी महापालिकेने मोठ्या प्रमाणात पाणी कपात करावी, अशी सूचना पाटबंधारे विभागाने महापालिका प्रशासनाला केली आहे. त्यामुळे मागील अडीच वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जात असलेल्या शहरवासीयांना आता दोन दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता रा.वि.सावंत यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना मंगळवारी (दि.28 जुलै) पत्र पाठविले आहे. मोठ्या प्रमाणात पाणी कपात करण्याची सूचना केली आहे. पिंपरी-चिंचवडसह मावळ भागातील विविध गावांचा पाण्याचा मुख्य स्रोत  पवना धरण आहे. महापालिका सध्या धरणातून 510 एमएलडी पाणी उचलते. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना नदीवरील रावेत – पुनावळे दरम्यान असलेल्या बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो. यंदा उन्हाळाही तीव्र होता.  उष्णतेची लाट, पाण्याचा वापर वाढल्याने धरणातील पाणी झपाट्याने कमी झाले. त्यातच यंदा पावसाने मोठी ओढ दिली आहे. जून महिन्या संपत आला. तरी, धरण क्षेत्रात जोरदार पावसाला सुरुवात झाली नाही.

पवना धरणात आजमितीला उपयुक्त पाणीसाठा 1.51 टीएमसी (17.79 टक्के) आहे. गतवर्षी आजमितीला 1.96 टीएमसी (34.80) उपयुक्त पाणीसाठा होता. गेल्यावर्षीच्या तुलनते यंदा 17 टक्के पाणीसाठा कमी आहे. धरण परिसरात 1 जून 2022 पासून अत्यंत कमी पाऊस झालेला (Pavana Dam) आहे. धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन 15 जुलै 2022 अखेरपर्यंत पिण्यासाठी, सिंचनासाठी पुरेल असे करण्यात येते. सद्यस्थितीत शहराला पाणीपुरवठा करणा-या पवना धरणात 17.79 टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणातील बाष्पीभवन, धरणाच्या वरील भागात पिण्यासाठी, सिंचनाचा पाणी वापर वजा जाता अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक राहतो.

Mumbai News : महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकतींसाठी 3 जुलैपर्यंत मुदतवाढ

महापालिकेचा दैनंदिन पाणीवापर असाच सुरु राहिल्यास आणि पाऊस लांबणीवर गेल्यास पिंपरी-चिंचवड शहरास पिण्यासाठी पाणी उपलब्ध राहणार नाही. तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. पवना धरणावरुन पिण्याच्या पाण्याच्या नळ पाणी पुरवठा खासगी योजना मोठ्या प्रमाणात आहेत. ग्रामपंचायती, खासगी संस्थांना पाणी उपलब्ध करुन द्यावे लागणार आहे. याचा विचार केला तर पिंपरी-चिंचवड शहरासाठी खूप कमी पाणीसाठा शिल्लक राहतो. शहरास पाणीपुरवठा करणा-या पवना धरणातील पाणीसाठा पाहता अत्यंत बिकट परिस्थिती असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे यापुढील कालावधीत अशीच परिस्थिती राहिल्यास महापालिकेस काटकसरीने पाणी वापर करावा लागणार आहे. वस्तुस्थिती विचारात घेऊन महापालिकेने अत्यंत काटकसरीने पाणी वापरास सुरुवात करावी आणि आवश्यक पाणी कपात करावी, अशी (Pavana Dam) सूचना केली आहे. त्यामुळे 25 नोव्हेंबर 2019 पासून एकदिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जात असलेल्या शहरवासीयांना आणखी पाणी कपातीला सामोरे जावे लागण्याची दाट शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.