Pavna River : पवना नदीत वेस्ट चिकन, मटन टाकण्यासाठी आलेल्या एकाला रंगेहाथ पकडले; गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – हिंजवडी (Pavna River) येथून सुमारे वेस्ट 400 किलो चिकन, मटन गोळा करुन पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना नदीवरील रावेत येथील जलउपसा केंद्रानजिक टाकण्यासाठी आलेल्या एका टेम्पो चालकाला रंगेहाथ पकडले. सुरक्षा रक्षकाने सतर्क राहून चालकाला पकडले. त्याच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
महापालिकेच्या रावेत येथील जलउपसा केंद्रानजिक मागील काही कालावधीपासून चिकन / मटन / मांस वेस्ट टाकण्यात येत असल्याबाबत तक्रारी आरोग्य विभागाकडे प्राप्त होत होत्या. हा कचरा हा रात्री उशिरा टाकण्यात येत असल्याचे आढळून आल्याने आरोग्य विभागामार्फत रात्रपाळीमध्ये गस्त घालण्याकरिता पथक नियुक्त करण्यात आलेले होते. तसेच पोलीसांमार्फत देखील या परिसरामध्ये चोवीस तास गस्त घालण्यात येत होती. या परिसरामध्ये कचरा टाकणा-यांचा शोध घेण्याकरिता कर्मचारी देखील नियुक्त करण्यात आलेले होते. परंतु, कचरा टाकणा-यांचा मागमूस लागत नव्हता.

सोमवारी रात्रपाळीमध्ये (Pavna River) रावेत येथील स्मशानभूमीमध्ये कार्यरत असलेल्या काळजीवाहक कर्मचा-यास नदीजवळ एका वाहनामार्फत कचरा टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. त्याच्यामार्फत वाहनांचे व्हिडीओ फोटोग्राफ्स काढण्यात आले. व्हिडीओ / फोटोग्राफ्सच्या अनुषंगाने पोलीस खात्याशी समन्वय साधून कचरा टाकणा-या वाहनाचा व त्याचे मालकांचा शोध घेण्यात आला.  हे वाहन हिंजवडी येथून चिकन / मटन वेस्ट गोळा करुन महापालिका हद्दीमध्ये टाकत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेच्या अनुषंगाने महापालिकेमार्फत वाकड पोलीस स्टेशन येथे संबंधिताविरुध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी सांगितले.
कोणत्याही व्यक्तीमार्फत शहरातील कोणत्याही भागामध्ये कचरा टाकण्यात येत असल्याचे आढळून आल्यास त्वरित महापालिकेस त्याची सूचना करावी. तसेच कोणीही व्यक्ती / संस्था / आस्थापना यांच्यामार्फत मोकळ्या जागेमध्ये कचरा टाकण्यात येणार नाही याचीही नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहनही डॉ. रॉय यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.