PCMC Election 2022: आरक्षण सोडतीवर 273 हरकती; प्रभाग 2, 5 मधील आरक्षणावर सर्वाधिक हरकती

एमपीसी न्यूज – आगामी पिंपरी-चिंचवड (PCMC Election 2022) महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाने काढलेल्या अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) आणि सर्वसाधारण (महिला) यांच्याकरिता आरक्षित जागांच्या सोडतीवर तब्बल 273 हरकती आल्या आहेत. त्यात प्रभाग क्रमांक 2 आणि 5 मधील आरक्षणावर सर्वाधिक म्हणजेच 269 हरकती आल्या आहेत. एकाच व्यक्तीने गठ्याने त्या हरकती दिल्या आहेत. एकूण 6 प्रभागातील आरक्षण सोडत, व्याप्तीबाबत हरकती आल्या आहेत.

महापालिका प्रशासनाने 31 मे रोजी ओबीसी आरक्षणाविना महिलांसाठीची आरक्षण सोडत काढली.  पिंपरी महापालिकेत 139 जागा असून यामध्ये 70 महिला आणि 69 पुरूषांसाठी जागा राखीव आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी (एससी) 22 जागा राखीव आहेत. त्यात महिलांसाठी 19, 41, 20, 18, 37, 43, 34, 24, 35, 11, 14 अशा 11 महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. तर, 2, 16, 17, 18, 22, 25, 29, 32, 37, 38, 39, 44, 46 या 11 जागा एससी पुरुष, महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जमाती (एसटी) महिलासाठी  44, 41 राखीव झाली आहे. तर, प्रभाग 6 मधून एसटी समाजातील पुरुष, महिलेला लढता येईल.

तर,  सर्वसाधारण महिलांसाठी 57 जागा आहेत. त्यातील 45 जागा थेट पद्धतीने राखीव झाल्या आहेत. प्रभाग क्रमांक 46 मध्ये थेटपद्धतीने एक जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव केली. त्यामुळे 12 प्रभागासाठी सोडत काढण्यात आली. यामध्ये सर्वसाधारण महिलेसाठी 40, 12, 36, 7, 21, 13, 1, 42, 8, 31, 27, 30 हे प्रभाग राखीव झाले. तर उर्वरित प्रभाग हे पुरूषांसाठी राखीव झाले आहेत.

Jansanvad Sabha : महापालिकेच्या जनसंवाद सभेत 127 तक्रारी

प्रभागनिहाय आरक्षण (PCMC Election 2022) निश्चितीबाबत 1 ते 6 जून 2022 दरम्यान नागरिकांकडून हरकती व सूचना मागविल्या होत्या. या मुदतीत आरक्षण सोडतीवर 273 हरकती आल्या आहेत. प्रभाग क्रमांक 2 चिखली गावठाण-मोरेवस्ती-कुदळवाडीतील एससीच्या आरक्षणावर आणि प्रभाग क्रमांक 5 चऱ्होली-चोविसावाडी-वडमुखवाडीतील एसटी आरक्षणा बदलावर सर्वाधिक हरकती आहेत. या दोन प्रभागाबाबत 269 हरकती एकाच व्यक्तीने दिल्या आहेत. हरकती एकसारख्याच आहेत. या दोनही प्रभागातील आरक्षण राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या पातळीवर बदलले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, प्रभाग क्रमांक 34, 35, 43, 11 याबाबत देखील (PCMC Election 2022) हरकती आल्या आहेत. या हरकतींवर सुनावणी देखील घेतली जाणार नाही. त्यामुळे हरकतींचा काही उपयोग होण्याची शक्यता नाही. आरक्षण निश्चितीबाबत प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांवर विचार करुन प्रभागनिहाय अंतिम आरक्षण 13 जून रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध केले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.