Pimpri News : पाकिस्तानातून आलेल्या धुळीच्या वादळाचा पुण्यातही प्रभाव

एमपीसी न्यूज – पाकिस्तनातून निघालेले धुळीचे वादळ गुजरात, अरबी समुद्रमार्गे महाराष्ट्रापर्यंत पोचले आहे. उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दृष्यमानता कमी झाली आहे. हे धुळीचे वादळ मुंबईनंतर आता पुण्यातही पोहोचले आहे. पुण्यातील देखील दृश्यमानता काही प्रमाणात कमी झाली आहे.

शनिवारी सकाळी पश्चिम पाकिस्तानमधून आलेल्या धुळीच्या वादळाने पाकिस्तानच्या कराचीमधील जनजीवन विस्कळीत केले. तिथली दृश्यमानता 500 मीटरपेक्षा कमी झाली होती. मात्र वायव्य भारतात पुढील 36 तास पश्चिम विक्षोभ खूप सक्रिय असल्याने धुळीच्या वादळाचा दिल्लीवर कोणताही परिणाम होणार नसल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

त्यानंतर हे वादळ गुजरात आणि दक्षिण राजस्थानच्या दिशेने जात आहे. पुढील 12 तासांपर्यंत त्याचा प्रभाव राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. सौराष्ट्र किनारपट्टीवर शनिवारी दुपारपासून धुळीचे वारे वाहू लागले आहेत. द्वारका स्थानकाने 400 मीटर दृश्यमानता नोंदवली आहे. पोरबंदर येथे वाऱ्याचा वेग ताशी 10 किमी पेक्षा जास्त होता आणि एक किलोमीटरपेक्षा कमी दृश्यमानता होती.

पुणे जिल्ह्यात देखील या धुळीच्या वादळाचा प्रभाव जाणवू लागला आहे. रविवारी (दि. 23) सकाळपासून धुक्याप्रमाणे वातावरण झाले आहे. तसेच हवेत गारठा असून पिंपरी चिंचवड शहरात रविवारी पहाटे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. अशा वातावरणाचा शेतीवर मोठा परिणाम होतो. विशेषता कापूस पिकावर याचा विपरीत परिणाम होतो. दरम्यान, हे धुळीचे वादळ संपेपर्यंत श्वसनाचे विकार असलेल्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.