Pimpri: पहिल्या 12 पैकी 11 रुग्ण ‘कोरोनामुक्त’;  शहरात 3 रुग्ण कोरोनाग्रस्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात दाखल असलेला आणखी एक रुग्ण ‘कोरोनामुक्त’ झाला आहे. या रुग्णाची दुसरी चाचणी आज (गुरुवारी) निगेटीव्ह आली आहे. त्यामुळे पहिल्या 12 पैकी 11 रुग्ण ठणठणीत झाले आहेत.  शहरात आता पहिल्या बारापैकी 1 आणि दिल्लीतून आलेले, पॉझिटीव्ह असलेले दोन असे तीन रुग्ण कोरोनाग्रस्त आहेत.

आज निगेटिव्ह अहवाल आलेला हा रुग्ण फिलिपिन्स येथून प्रवास करुन शहरात आला होता. 18 मार्च रोजी हा रुग्ण कोरोनाग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले होते. या रुग्णाचे 14 दिवसांचे पहिले रिपोर्ट 31 मार्च रोजी निगेटीव्ह आले होते. त्यानंतर दुसरे रिपोर्ट देखील आज निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे हा रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. या रुग्णाला घरी सोडण्यात येणार आहे. आता त्याचा भाऊ असलेला कोरोनाग्रस्त एक आणि दिल्लीतून आलेले दोन असे तीन रुग्ण शहरात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 12 मार्च रोजी कोरोनाचे पहिले तीन रुग्ण ‘पॉझिटीव्ह’ आढळले होते. हे तीन रुग्ण 27 मार्च रोजी  ‘कोरोनामुक्त’ होत ठणठणीत बरे झाले. तर,  28 मार्च रोजी आणखी सहा रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. त्यानंतर 31 मार्च रोजी एक आणि आज (गुरुवारी) एक रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे पहिल्या 12 रुग्णांपैकी 11 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान,  दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी जमातच्या मर्कझमधील धार्मिक कार्यक्रमांतून आलेले दोन रुग्ण आज 2 एप्रिल रोजी पॉझिटीव्ह आढळले.  त्यामुळे शहरात आता तीन कोरोनाग्रस्त रुग्ण  आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.