Pimpri: रस्ते साफसफाईची 647 कोटीची निविदा रद्द करा, फेरनिविदा काढा

विरोधी पक्षनेते नाना काटे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांची मागणी

एमपीसी न्यूज – शहरातील रस्ते यांत्रिकी पध्दतीने साफसफाई करण्याच्या 647 कोटींच्या कंत्राटात सहाच ठेकेदरांनी आलटून पालटून निविदा भरल्या असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यात स्पर्धा झाली नसल्याने करदात्या नागरिकांच्या पैशांचा अपव्यय होणार आहे. त्यामुळे तत्काळ ही निविदा रद्द करावी. नव्याने पारदर्शक पद्धतीने फेरनिविदा काढण्याची मागणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली. तर, या रिंगमध्ये खासदार, आमदार, सभापती, स्थायी समिती सदस्य सर्वपक्षीय पदाधिकारी, कंञाटदार, आयुक्तांचा सहभाग असल्याचा आरोप करत त्यांची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात काटे यांनी म्हटले आहे की, शहरातील रस्ते यांत्रिकी पध्दतीने साफसफाई करण्याच्या कंत्राटात रिंग होण्याची शक्यतेबाबत यापुर्वीच कळविले होते. त्याप्रमाणे तांत्रिक छाननीमध्ये या निविदेसाठी देशभर निविदा प्रसिध्द करुनही केवळ सहाच ठेकेदारांनी आलटून-पालटून निविदा भरल्या आहेत. महापालिकेचे स्वच्छतेचे काम करणा-या ठराविक ठेकेदारांनीच या निविदा भरलेल्या आहेत.

यासाठी संयुक्त निविदा न काढता सहा पॅकेजमध्ये विभागणी करुन सात वर्षासाठी निविदा का काढली? यामुळे सुमारे एक हजार कर्मचारी बेरोजगार होणार आहेत. त्यांच्या भविष्याचे काय? असा सवाल करत या निविदेत स्पर्धा झाली नसल्याने अधिकच्या पैशांचा खर्च होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ही निविदा प्रक्रीया रद्द करावी. पारदर्शकपणे फेरनिविदा काढावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

यांत्रिकी पद्धतीने रस्ते साफसफाईची रिंग झालेली निविदा रद्द करावी. दुर्देवाची बाब म्हणजे यामध्ये महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि विरोधक शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचे पदाधिका-यांनीच मिळून मिसळून गोलमाल केला आहे. त्यामुळे यात सहभागी असलेले खासदार, आमदार, स्थायी समिती सभापती, स्थायी समिती सदस्य, सर्वपक्षीय पदाधिकारी, कंञाटदार आणि महापालिका आयुक्तांची चौकशी करावी. यातील दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.