Pimpri: अ. मा. भालकर महापालिकेत रुजू; शहर अभियंता कि सह शहर अभियंतापद देण्याबाबत घोळ

एमपीसी न्यूज – राज्य सरकारने अधीक्षक अभियंतापदी बढती देत पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रतिनियुक्तीवर पाठविलेले अ.मा. भालकर आज (मंगळवारी) रुजू झाले आहेत. त्यांच्याकडे शहर अभियंतापद द्यायचे की सह शहर अभियंतापद याबाबतचा घोळ सुरु आहे. त्यामुळे भालकर यांना केवळ रुजू करुन घेतले असून त्यांच्याकडे कोणताही पदभार दिला नाही. पदभार देण्याबाबतचा निर्णय घेण्याची प्रक्रिया चालू असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

महापालिकेचे शहर अभियंता अंबादास चव्हाण 30 एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे हे पद रिक्त आहे. तात्पुरता स्वरूपात सह शहर अभियंता राजन पाटील यांच्याकडे शहर अभियंतापदाचा अतिरिक्त पदभार दिला होता. राज्य सरकारने 7 जून रोजी सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अधिकारी अ. मा. भालकर यांना अधिक्षक अभियंतापदी बढती देत पिंपरी महापालिकेत प्रतिनियुक्तीवर पाठविले आहे.

  • तब्बल महिन्याभरानंतर भालकर आज (मंगळवारी)महापालिकेत दाखल झाले. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यांना महापालिकेत रुजू करुन घेतले आहे. परंतु, त्यांच्याकडे कोणताही पदभार दिला नाही. त्यांच्याकडे शहर अभियंता कि सह शहर अभियंतापद देण्याबाबतचा घोळ सुरु आहे.

याबाबत ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ”राज्य सरकारने अ. मा. भालकर यांची अधिक्षक अभियंतापदी बढती देत पदोन्नतीने महापालिकेत प्रतिनियुक्ती केली आहे. त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आदेशानुसार आज रुजू करुन घेण्यात आले आहे. त्यांच्याकडे कोणता पदभार द्यायचा याबाबत ठरवलेले नाही. त्यावर निर्णय घेण्याची प्रक्रिया चालू आहे. आपल्याकडे तीन पर्याय आहेत. शहर अभियंता, स्मार्ट सिटीमध्ये देखील अभियंत्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे कोठेही त्यांना समाविष्ट करुन घेतले जाईल.

राज्य सरकारने भालकर यांना अधीक्षकअभियंताबढती दिली आहे. महापालिकेतील समकक्षपद शहर अभियंता किंवा सह शहर अभियंता आहे. आकृतीबंधानुसार शहर अभियंतापद प्रतिनियुक्तीच्या अधिका-याकडे देऊ शकतो. यापूर्वी प्रतिनियुक्तीवरील अधिका-याकडे शहर अभियंतापद दिले आहे. कायदेशीररित्या भालकर यांच्याकडे शहर अभियंतापद देऊ शकतो”, असेही आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.