Pimpri : केअरटेकर महिलाच निघाली चोरः पितळ उघडे

एमपीसी न्यूज – आपल्यावर झालेले कर्ज फेडण्यासाठी महिला केअरटेकरने वृद्ध मालकिणीच्या हातातील सव्वा लाखांच्या सोन्याच्या बांगड्या चोरल्या. त्यानंतर एका एलआयसी एजंटने बांगड्या काढून नेल्याचा बनाव केला. तसेच या प्रकरणात केअरटेकरने स्वतः फिर्याद देखील दिली. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास करत केअरटेकरचे पितळ उघडे पाडले. फिर्यादीच आरोपी असल्याचे पोलिसांनी तपासात निष्पन्न करून केअरटेकर महिलेला बेड्या ठोकल्या आहेत.

रंजना सुरेश उत्तेकर (वय 40, रा. इंद्रायणी हाऊसिंग सोसायटी, रुपीनगर, निगडी) असे चोरीचा बनाव केलेल्या केअरटेकर महिलेचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रंजना ही महिला ग्यानीबाई मुलचंद रामनानी (वय 88) यांच्या घरात केअरटेकर म्हणून काम करत होती. 2 डिसेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास एलआयसीचे पैसे भरण्याच्या निमित्ताने घरात घुसून एका चोरट्याने घरातील वृद्ध महिलेच्या हातातून एक लाख 30 हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या बांगड्या काढून नेल्या, अशी फिर्याद आरोपी रंजना हिने दिली.

या गुन्ह्याचा तपास करत असताना पिंपरी पोलिसांनी परिसराची पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच ग्यानीबाई यांचा देखील जबाब घेतला. मात्र, त्यांच्यासोबत असा प्रकार झाला नसल्याचे त्यांनी आपल्या जबाबात सांगितले. त्यामुळे पोलिसांचा रंजना हिच्याबाबत संशय बळावला. त्यामुळे रंजनाला पोलीस ठाण्यात बोलावून तिच्याकडे कसून चौकशी केली. पोलिसांच्या प्रश्नांसमोर रंजनाचे पितळ उघडे पडले.

तिच्यावर झालेले कर्ज फेडण्यासाठी तिला पैशांची आवश्यकता होती. त्यामुळे तिनेच ग्यानीबाई यांच्या तीन तोळ्यांच्या सुमारे 1 लाख 30 हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या चोरल्या आणि चोरीचा बनाव रचला. पोलिसांनी सोन्याच्या बांगड्या हस्तगत केल्या आहेत. रंजनाची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सहपोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख, उपनिरीक्षक अशोक निमगिरे, पोलीस कर्मचारी राजेंद्र भोसले, नागनाथ लकडे, श्रीकांत जाधव, जावेद बागसिराज, प्रतिभा मुळे, शहाजी धायगुडे, गणेश करपे, रोहित पिंजरकर, उमेश वानखेडे, सोमेश्वर महाडिक यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.