Pimpri : पिंपरी चिंचवड शहरात पाच ठिकाणी घरफोडी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात दिघी, भोसरी, आळंदी, वाकड, हिंजवडी परिसरात घरफोडीचे प्रकार घडले आहेत. या सर्व प्रकारांमध्ये टॅबलेट, लॅपटॉप, लेदर पिशव्या, मोबाईल, टीव्ही आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख 64 हजार 240 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी बुधवारी (दि 25) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

राकेश रमेश तापकीर (वय 27, रा. गजानन महाराज नगर, दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. राकेश यांचे मॅक्झिन चौकात प्रगती स्नॅक्स सेंटर नावाचे दुकान आहे. या दुकानातून अज्ञात चोरट्यांनी भर दिवसा सहा हजार रुपये किमतीचा एक टॅबलेट चोरून नेला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

दत्तात्रय माधवराव गायकवाड (वय 61, रा. संभाजीनगर, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दत्तात्रय यांचे झेरॉक्सचे दुकान आहे. मंगळवारी (दि. 24) रात्री सव्वा नऊच्या सुमारास त्यांनी दुकान बंद केले. त्यानंतर रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या दरवाजाचा कोयंडा आणि कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातून 15 हजार रुपयांचा एक लॅपटॉप आणि चारशे रुपयांचे चिल्लर पैसे चोरून नेले.  बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

मीनाक्षी गुलाब काळे (वय 39, रा. केळगाव, ता. खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मीनाक्षी यांचा लेदर पिशव्या बनविण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्या  घराच्या शेजारी असलेल्या खोलीत ते पिशव्या बनविण्याचे काम करतात. ती खोली 21 डिसेंबर ते 24 डिसेंबर या कालावधीत बंद होती. अज्ञात चोरट्यांनी खोलीच्या लोखंडी ग्रीलचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. खोलीतून  17 हजार 840 रुपये किमतीच्या 216 लेदर पिशव्या आणि शिलाई मशीन चोरून नेली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

दादाराव हरिभाऊ आढाव (वय 58, रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी दादाराव यांचे घर मंगळवारी (दि. 24) दुपारी दोन ते पाच वाजण्याच्या कालावधीत कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातून एक लाख रुपयांची रोकड, पाच हजारांचा एक मोबाईल फोन आणि कागदपत्रे चोरून नेली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

राजीव गोविंद रथकंठीवार (वय 62, रा. पौडरोड, कोथरूड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी राजीव यांच्या घरातून वीस हजार रुपये किमतीचा एक टीव्ही चोरून नेल्याची घटना 12 डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. याबाबत त्यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तपास करत सचिन बाबाराव तावडे (वय 29, रा. मारुंजी) याला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.