Pimpri: खड्डे, अनधिकृत खोदाई किती जणांचे बळी घेणार? नगरसेवकांचा संतप्त सवाल

आकुर्डीतील दुचाकीस्वार महिलेच्या मृत्यूप्रकरणी नेमली चौकशी समिती

एमपीसी न्यूज – आकुर्डी रेल्वे स्थानक परिसरात विविध वाहिन्या टाकण्यासाठी खोदकाम करुन टाकलेल्या राडारोड्यावरुन दुचाकी घसरली. त्याचवेळी पाठीमागून आलेली चारचाकी वाहन डोक्यावरुन गेल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेच्या मृत्यूला जबाबदार कोण आहे. जबाबदारीपासून महापालिका प्रशासन हात झटकते, एकमेकांवर जबाबदारी झटकली जाते. शहरात मोठ्या प्रमाणात अधिकृत, अनधिकृत खोदाई सुरु आहे. खोदाई किती जणांचे बळी घेणार आहे, असा संतप्त सवाल नगरसेवकांनी महासभेत केला. दरम्यान, आकुर्डीतील दुचाकीस्वार महिलेच्या मृत्यूप्रकरणी चौकशी करण्यासाठी द्विसदस्यी समिती नेमली आहे. तीन दिवसात समिती अहवाल देणार असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

आकुर्डी रेल्वे स्थानक परिसरात विविध वाहिन्या टाकण्यासाठी खोदकाम केलेले आहे. त्याचा राडारोडा रस्त्यावर पसरला आहे. त्यावरून दुचाकी घसरून सरस्वती शिंदे (वय 56, रा. चिखली) खाली पडल्या. त्यांच्या डोक्यावरून मोटार गेल्याने शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 18) घडली. आज (शनिवारी) झालेल्या महासभेला सुरुवात होताच राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांनी या अपघाताकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

यावेळी साने म्हणाले, महापालिकेकडून शहरात सर्वेत्र खोदाई केली जात आहे. पाणीपुरवठा, स्मार्ट सिटीच्या कामासाठी खोदाई केली जात आहे. परंतु, काम चालू असताना नागरिकांच्या सुरक्षिततेची दक्षता घेतली जात नाही. बॅरिकेट्स लावले जात नाहीत. राडारोड्यावरुन दुचाकी घसरुन खाली पडली. त्याचदरम्यान पाठीमागून आलेली चारचाकी अंगावरुन गेल्याने महिलेचा मृत्यू झाला असताना प्रशासन हात झटकत आहे. महिलेच्या मृत्यूला जबाबदार कोण आहे?, प्रशासन आणखी किती जणांचे बळी घेणार आहे.

भाजपचे राहुल जाधव म्हणाले, खड्यात जाणा-या बळीला जबाबदार कोण आहे. स्मार्ट सिटीसाठी खोदाई केली जाते. परवानगी नसताना खोदाई केली जात आहे. नाहक नागरिकांचे बळी जात आहेत. परवानी घेऊन खोदाई होते का याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. परवानगी आहे. तिथेच खोदाई करावी.

त्यावर खुलासा करताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, आकुर्डीतील घटना गंभीर आहे. प्रशासनाने त्याची दखल घेतली आहे. घटना कशी घडली. त्याला जबाबदार कोण आहे. बॅरिकेट््स लावले होते की नाही? याची चौकशी केली जाईल. अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील व सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांची द्विसदस्यी चौकशी समिती नेमण्यात येत असून तीन दिवसात या समितीने सविस्तर अहवाल देण्याचा आदेश आयुक्तांनी समितीला दिला.

अहवाल आल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. प्रशासनाने यांची गांभीर्याने दखल घेतली आहे. बॅरिकेट्स लावण्याचे कंत्राटदारांना निर्देश दिले आहेत. स्मार्ट सिटी, पाणीपुरवठा विभाग, बीआरटी, जलनि:सारण विभागाने समन्वय ठेवून खोदाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.