Pimpri: महापौर, सभागृह नेते, आयुक्त अनुपस्थित, महासभा पुन्हा लांबणीवर; अडीच वर्षात 50 वेळा सभा तहकूब

जुलै महिन्याची सलग सहाव्यांदा तर ऑगस्टची तिस-यांदा सभा तहकूब

एमपीसी न्यूज – महापालिकेत एकहाती सत्ता असलेल्या भाजपने शहर विकास आणि सभा कामकाजाबाबत जराही गांभीर्य नसल्याचे सिद्ध केले आहे. भाजप पदाधिका-यांनी महासभा तहकूब करण्याचा सपाटा कायम ठेवला असून अडीच वर्षाच्या राजवटीत तब्बल 50 वेळा सभा तहकूब केल्या आहेत. जुलै महिन्याची सलग सहाव्यांदा तर ऑगस्टची तिस-यांदा सभा तहकूब केली. त्यामुळे अनेक प्रस्ताव रखडले असून आता जुलै आणि ऑगस्टच्या दोन्ही सभा शनिवारी (दि. 7) रोजी आयोजित केल्या आहेत. दरम्यान, महापौर राहुल जाधव, सभागृह नेते एकनाथ पवार आणि आयुक्त श्रावण हर्डीकर आजच्या सभेला अनुपस्थित होते.

जुलै आणि ऑगस्टच्या दोन्ही तहकूब सभा आज (सोमवारी) आयोजित केल्या होत्या. उपमहापौर सचिन चिंचवडे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील आठवड्यात लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून महासभा तहकूब करण्याचा खेळ संपवून भाजप पदाधिकारी आज सभा कामकाज पूर्ण करतील अशी अपेक्षा शहरवासियांना होती. परंतु, आज पुन्हा महासभा लांबणीवर टाकल्या आहेत.

भाजपच्या सभा तहकुबींच्या ‘तारीख पे तारीख’ धोरणामुळे अनेक महत्त्वाचे प्रस्ताव लालफितीत अडकत आहेत. महापालिकेत भाजपचे 77 नगरसेवक आहेत. 14 मार्च 2017 रोजी पहिली सभा होवून नवीन सभागृह अस्तित्वात आले. मात्र, सभेच्या कामकाजाबाबत भाजप नगरसेवकांमध्ये उदासिनता आहे. मागील अडीच्या वर्षाच्या कालावधीत तब्बल 50 वेळा महासभा तहकूब करण्यात आल्या आहेत.

मान्यवरांना श्रध्दांजली म्हणून काही मिनिटे सभा तहकूब करुन पुन्हा सभेचे कामकाज सुरु करणे अपेक्षित असताना दोन-दोन महिने सभा कामकाज पुढे ढकलण्यात येत आहेत. वादग्रस्त प्रस्तावांवरील चर्चा टाळणे, प्रस्तावांची ‘सेटींग’, पक्षांतर्गत राजकारण, गटबाजी, विरोधी गटाचे प्रस्ताव हाणून पाडणे, प्रशासनावर दबाव आदींसाठी सभा तहकुबीचे राजकारण केले जात आहे.

महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांचे एक महिन्याची आणि अधिका-यांचे एक दिवसाचे मानधन पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे. याबाबतचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द करण्यासाठी महापौर राहुल जाधव, सभागृह नेते एकनाथ पवार आणि आयुक्त श्रावण हर्डीकर मुंबईला गेले आहेत.

आता जुलै आणि ऑगस्टच्या महासभा शनिवारी होणार!
जुलै महिन्याच्या महासभेला सप्टेंबर महिना उजाडला तरीही मुहुर्त लागला नाही. विविध कारणांनी जुलै महिन्याची महासभा सलग सहावेळा तहकूब करण्याचा विक्रम सत्ताधा-यांनी केला आहे. तर, ऑगस्ट महिन्याची सभा तहकूब करण्याची हॅटट्रिक केली आहे. आता या दोन्ही महासभा शनिवारी (दि. 7) रोजी आयोजित केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.