Pimpri: पिंपरीचे मैदान मारण्यासाठी राष्ट्रवादीचे शेखर ओव्हाळ लागले कामाला; ‘वन बूथ-टेन युथ’ मोहीम घेतली हाती

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत तरुण चेह-यांना संधी देण्याचे जाहीर केल्यानंतर पक्षातील तरुण नेत्यांमध्ये चैतन्य पसरले आहे. राष्ट्रवादीचे युवानेते इच्छुक उमेदवार शेखर ओव्हाळ यांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. ‘वन बूथ-टेन युथ’ मोहीम राबवून पक्षसंघटना मजबूत करण्यावर भर दिला असून त्यांना नागरिकांचा पाठिंबा वाढत आहे. संघटनेच्या जोरावर ओव्हाळ यांनी तगडे आव्हान निर्माण करण्याची तयारी सुरु केली आहे.

पिंपरी विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असल्याने हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. 2009 मध्ये मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला आमदार निवडून आला होता; मात्र, पक्षातंर्गत मतभेद, पदाधिका-यांचे गट-तट आणि एकमेकांच्या पाय ओढण्याच्या रस्सीखेचात 2014 मध्ये पिंपरी विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ शिवसेनेने ताब्यात घेतला.

  • त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला पिंपरी विधानसभा मतदारसंघातून काही प्रमाणात उतरती कळा लागली. महापालिकेच्या 2017 मधील निवडणुकीत शहरातील तीन मतदारसंघापैकी पिंपरीतून राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले. पण, पक्षाच्या काही नेत्यांना आपापले प्रभाग ताब्यात ठेवण्यात अपयश आले. त्यामुळे पिंपरी विधानसभा मतदारसंघ पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेखर ओव्हाळ यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी, युवक कार्यकर्ते यांना सर्वांना विश्वासात घेवून पिंपरी विधानसभा निवडणुकीत जोरदार मोर्चेबांधणीस सुरवात केली आहे.

  • राष्ट्रवादी काँग्रेसची ‘वन बूथ-टेन युथ’ मोहीम राबवून पक्षाला बळकटी देण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसेच त्यांनी गोरगरीब, गरजू घटकांतील लोकांना सतत मदतीचा हात दिला आहे. त्याचा सुख-दुखात सहभागी होवून चाहता वर्ग निर्माण केला आहे. ओव्हाळ यांनी तरुण कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण करुन मतदारसंघात दांडगा जनसंपर्क सुरु ठेवला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.