Pimpri News: गेल्या दोन वर्षातील कामांच्या जोरावर ‘आपला महासंघ पॅनलचा’ विजय निश्चित : अंबर चिंचवडे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाची पदाधिकारी निवडणुक शुक्रवारी (दि. 25) होणार आहे. मागील दोन वर्षांपुर्वी 11 जानेवारी 2020 ला प्रथमच लोकशाही मार्गाने निवडणूक झाली. यामध्ये कर्मचा-यांनी एक ऐतिहासिक कौल दिला व एक विचाराच्या आपला महासंघ पॅनलला निवडून दिले. त्याच्या माध्यमातून कर्मचा-यांच्या हिताचे असणारी सर्व कामे सहकाऱ्यांच्या मदतीने पुर्ण केली आहेत. या गेल्या दोन वर्षातील कामांमुळे ‘आपला महासंघ पॅनलचा’ विजय निश्चित आहे असा दावा पॅनल प्रमुख व कर्मचारी महासंघाचे विद्यमान अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनी पत्रकार परिषदेत केला.

पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत चिंचवडेंबरोबर ‘आपला महासंघ पॅनलचे’ सर्व प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी चिंचवडे यांनी सांगितले की, महासंघाच्या माध्यमातून अनेक चांगल्या गोष्टी करण्यात आल्या. त्यामध्ये प्रामुख्याने महानगरपालिकेतील जवळपास 102 पदोन्नतीच्या आदेशातून 628 कर्मचारी, अधिकारी यांना पदोन्नतीचा लाभ मिळवून देण्यात आला. यापूर्वी आपल्या महानगरपालिकेत क्वचितच कुणाचे तरी प्रमोशन झाले अशी कधीतरी बातमी ऐकायला मिळायची. परंतु माहे मे 2020 पासून आपल्या महानगरपालिकेत पदोन्नतीची रांग लागली. गेल्या दीड वर्षात वर्ग 1 ते वर्ग 4 मधील सर्वांनाच याचा लाभ झाला आणि हे सर्व कर्मचारी महासंघाच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळेच झाले.

ते पुढे म्हणाले, गतकाळात असलेले कामगारांचे नेतृत्व कसे कुचकामी होते. किंबहुना त्यांना दूरदृष्टी नसल्याचे अधोरेखित झाले. स्वत:ला काहीच फायदा मिळणार नसल्याने इतरांचे भले करण्याची त्यांच्यामध्ये मानसिकता नसल्याचे दिसून आले. कारण आपल्याच महानगरपालिकेमध्ये पहिलं प्रमोशन मिळविण्यासाठी कर्मचाऱ्यांना 26-27 वर्षे वाट पाहावी लागली हीच मोठी शोकांतिका आहे. काही कर्मचारी, अधिकारी ज्या पदावर कामावर रुजू झाले. त्याच पदावर सेवानिवृत्त व्हावे लागले. तसेच पदोन्नती न मिळाल्यामुळे त्यांच्या मनात आयुष्यभरासाठी एक सल कायमचीच राहिली. तसेच सातव्या वेतन आयोगातील निर्देशानुसार आश्वासित प्रगती योजनेचा लाभ कर्मचा-यांना मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये 10 वर्षे पूर्ण झालेल्या 802 कर्मचारी, अधिकारी यांना याचा फायदा झाला आहे. कोरोनासारख्या महामारीचा सामना करत असताना सर्वच कर्मचाऱ्यांना पहिल्या लॉकडाऊन कालावधीमध्ये 150 रुपयेप्रमाणे 65 दिवसांचा प्रोत्साहन भत्ता मिळवून दिला.

तसेच दुस-या लॉकडाऊनमध्ये वैद्यकीय विभागातील कर्मचारी, अधिकारी यांना अनुक्रमे पाच, दहा, पंधरा हजार रुपये प्रोत्साहन भत्ता मिळवण्यात महासंघ यशस्वी झाला. याशिवाय महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना दरवर्षी गणवेश देण्यात येतो. महापालिका कर्मचाऱ्यांच्या गणवेशावर कोट्यवधी रुपये खर्च करते त्याचा हेतू हा की कर्मचाऱ्यांना चांगला गणवेश मिळाला पाहिजे. त्यामुळे गणवेशापोटी देय असणारी रक्कम कर्मचाऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात आली व त्या रकमेमध्ये दरवर्षी दहा टक्के वाढ केली असा कर्मचारी हिताचा दूरगामी निर्णय घेण्यात आला, त्यामध्ये ठेकेदारालाही आळा घातला आणि महानगरपालिकेचाही फायदाच झाला आहे, असे चिंचवडे यांनी सांगितले.

एमपीसी न्यूज शिक्षण संवाद – विशेष संपादकीय : डॉ. अ. ल. देशमुख

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.