Pimpri News: राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे हेच माझे राजकीय वारसदार – विलास लांडे

 एमपीसी न्यूज: पिंपरी-चिंचवड शहराचे महापौर, हवेली, भोसरी विधानसभेचे आमदार असे विविध पदे भुषविलेली, मोठी राजकीय कारकिर्द असलेले आणि शहराच्या राजकारणातील शरद पवार असे संबोधले जाणारे विलास लांडे यांनी अखेर आपला राजकीय वारसदार जाहीर केला. आपले जवळचे नातलग, राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे हेच माझे राजकीय वारसदार असल्याचे लांडे यांनी जाहिररीत्या घोषित केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी निवडीनंतर झालेल्या पत्रकारपरिषदेत त्यांनी ही घोषणा केली.

विलास लांडे यांना मोठा राजकीय वारसा आहे. त्यांचे वडील स्वर्गीय विठोबा लांडे नगरसेवक होते. ते स्वत: शहराचे महापौर, त्यांच्या पत्नी मोहिनी लांडे यांनी देखील महापौरपद भूषविले. त्यांच्या बंधुनींही नगरसेवक म्हणून काम केले. त्यांचे चिरंजीव विक्रांत विद्यमान नगरसेवक आहेत. लांडे हवेली, भोसरीचे आमदार राहिलेत. त्यांनी शिरुरमधून लोकसभेची निवडणूकही लढविली. धुर्त, अत्यंत हुशार अशी विलास लांडे यांची शहराच्या राजकारणात ओळख आहे. देशाचे नेते शरद पवार यांनी विलास लांडे यांच्याबाबत सत्तेचा कैफ नसलेला विनम्र नेता असे विधान केले होते.

शहरातील सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. त्यांचे कार्यकर्त्यांचे जाळे आहे. लांडे यांनी अनेकांना पदे दिली. विविध ठिकाणी काम करण्याची संधी दिली. आता विलास लांडे यांनी जाहिररित्या आपले जवळचे नातलग अजित गव्हाणे यांना आपला राजकीय वारसादर जाहीर केले. लांडे यांच्या राजकारणातील दांडग्या अनुभवाचा, कार्यपद्धतीचा गव्हाणे यांना राजकारणात मोठा फायदा होईल असे जाणकारांचे मत आहे.

शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांना देखील राजकीय पार्श्वभूमी आहे. अजित गव्हाणे यांची ही चौथी टर्म आहे.  त्यांनी स्थायी समिती अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. शहराच्या राजकारणातला शांत संयमी आणि सर्वसमावेशक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे लांडे यांनी योग्य व्यक्तीला राजकीय वारसदार निवडल्याची चर्चा आहे. नवनिर्वाचीत अध्यक्ष अजित गव्हाणे हे राजकारणात कसलेल्या लांडे यांच्या तालमीत तयार झालेले आहेत. गव्हाणे यांना शहराध्यक्ष पदाबरोबरच लांडे यांच्या राजकीय वारसदाराच्या संधीमुळे पुढील कालावधीत होणारे बदल पाहणे औत्सुकाचे ठरणार असे राजकीय धुरीणांचे मत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.