Pune News : पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे सोमवारी (दि. 14) अनावरण करण्यात आले. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (दूरदृष्य प्रणालीद्वारे), अन्न व नागरी पुरवठा मंत्री  छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, विधान  परिषदेच्या सभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (दूरदृष्य प्रणालीद्वारे) राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रच नाही तर पूर्ण देशातील गोरगरीब वर्गाच्या सुधारणेसाठी, शिक्षणासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आदी महात्म्यांनी केलेले कार्य त्यांचे जीवन चरित्र अभ्यासून हे कार्य आपण पुढे नेले पाहिजे असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

https://www.youtube.com/watch?v=C1cT7Wcd7Gc

राज्यपाल कोश्यारी पुढे म्हणाले, फुले दांपत्याने ज्यावेळी समाजसुधारणेचे काम केले त्या काळात इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळवण्यापेक्षा समाजाला कुप्रथांपासून दूर करणे अधिक कठीण होते. त्या काळात समाजातील सर्वात दबलेल्या महिला, मातृशक्ती तसेच मागास, गरीब समाजाच्या उत्थानासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी काम केले. त्यांच्या शिक्षणप्रसाराच्या, समाजसुधारनेच्या कामाला प्रचंड विरोध झाला परंतू कुप्रथा दूर करण्याचे त्यांनी जे स्वप्न पाहिले ते जीवनाच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी काम केले.

सावित्रीबाई यांच्या जीवनाचा कालखंड हा इतिहास वाचण्यापेक्षा इतिहास घडवण्याचा, लिहिण्याचा कालखंड होता असेही श्री. कोश्यारी म्हणाले. सावित्रीबाई जर आज असत्या तर विद्यापीठे, शैक्षणिक क्षेत्रात मुली, महिलांचे अग्रस्थान पाहून त्यांना अतिशय आनंद वाटला असता असेही ते म्हणाले.

सावित्रीबाई फुले यांच्या नावाला साजेसे अभ्यासक्रम राबवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, सर्वांना अभिमान वाटेल असा हा सोहळा आहे. सावित्रीबाई फुले यांचे नाव त्याच्याविषयीचे ऋण व्यक्त करण्यासाठी आपण दिले, मात्र त्या स्वत: एक विद्यापीठ होत्या. फुले दाम्पत्याने समाजबांधवांच्या आयुष्यात फुले फुलविण्याचा, त्यांच्या संसारात आनंद ‍निर्माण करण्याचा प्रयत्न केला. विद्यापीठाने केवळ पुतळा उभारण्यापर्यंत मर्यादीत न रहाता सावित्रीबाईंच्या कार्याबाबात आदर वाटेल आणि त्यांच्या नावाला साजेसे असे अभ्यासक्रम राबवावेत, जेणेकरून विद्यापीठाचे नाव जगभरात आदराने घेतले जाईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

देश आणी समाज निरोगी असावयास हवा यासाठी समाजाला विचार देण्यासोबत सावित्रीबाई फुले यांनी आपल्या वर्तनात तो विचार आणला. देश स्वतंत्र झाल्यावर तो रुढी परंपरांमध्ये अडकलेला नसावा यासाठी महात्मा फुले आणि इतर समाजसुधारकांनी प्रयत्न केले. सावित्रीबाई फुले यांनी दिव्याच्या ज्योतीप्रमाणे इतरांना प्रकाश देण्याचे कार्य केले. त्यांचा ज्ञानार्जनाबाबतचा विचार  स्वीकारला तर प्रगती शक्य आहे. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत समाजासाठी कार्य केले. प्रत्येकाला मर्यादेचे भान आले  आणी भेद बाजूला सारता आले तर खऱ्या अर्थाने  हे विचार समाजापर्यंत पोहोचले असे म्हणता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.