Pimpri News: मुंबईप्रमाणेच पिंपरीतही 500 चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्तांचा कर माफ करा; महापौरांची ‘सीएम’कडे मागणी

एमपीसी न्यूज – बृहन्मुंबई महापालिका हद्दीतील 500 चौरस फुटांपर्यंतच्या निवासी मिळकतींचा मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा नुकतीच करण्यात आलेली आहे. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील 500 चौरस फुटापर्यंतच्या निवासी मिळकतींचा मिळकत कर पूर्णपणे माफ करुन शहरातील निवासी मिळकतधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी  महापौर उषा ढोरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.

निवेदनात महापौर ढोरे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड ही औद्योगिक व कामगारनगरी असून अनेक गोरगरीब कामगार हे पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास आहेत. सध्या कोरोना विषाणूचे संकट पूर्णत: टळलेले नसल्याने बरेच उद्योग, व्यवसाय हे पूर्वपदावर आलेले नाहीत. त्यामुळे शहरातील अनेक गोरगरीब कष्टकरी, कामगार व खाजगी नोकरदार वर्गाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता 500 चौरस फुटांपर्यंतच्या निवासी घरांचा मालमत्ता कर रद्द केल्यास सर्वसामान्य मिळकतधारकांना दिलासा मिळेल.

महापालिका सर्वसाधारण सभेत पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील 500 चौरस फुटांपर्यंतच्या निवासी मिळकतींचा कर माफ करण्याचा ठराव मंजूर झालेला आहे. त्यानुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील 500 चौरस फुटांपर्यंतच्या निवासी मिळकतींचा मालमत्ता कर बृहन्मुंबई महापालिकेप्रमाणेच माफ करणेत यावा, अशी मागणी महापौर  ढोरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राव्दारे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.