Pimpri News: महापौरांकडून विकास कामांची उदघाटने , भूमिपूजनाला ‘ब्रेक’; नगरसेवकांच्या पत्रांना केराची टोपली

एमपीसी न्यूज – आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता कधीही जाहीर होऊ शकते. त्यापूर्वीच पाठपुरावा करुन झालेल्या विकास कामांचे उद्घाटन,  मंजूर झालेल्या कामांचे भूमिपूजन करण्यासाठी नगरसेवकांचा आग्रह आहे. पण, महापौर उषा ढोरे नगरसेवकांना दाद देत नाहीत. उद्घाटनाचे पत्र स्वीकारले जाते. पण, ते संबंधित विभागाकडे कार्यवाहीसाठी पाठविले जात नसून त्याला केराची टोपली दाखविली जाते. राष्ट्रवादी आणि स्वपक्षातील पण राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेल्या नगरसेवकांच्या प्रभागातील विकास कामांच्या उद्घाटनाला वेळ न देऊन नाकेबंदी केली जात असल्याचा आरोप होत आहे. महापौरांवर प्रचंड दबाव असल्याने परवानगी देत नसल्याचा आरोप नगरसेवकांकडून केला जात आहे.

महापालिका निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पाच वर्षात पाठपुरावा करुन झालेल्या विकासकामांचे उद्घाटन, मंजूर झालेल्या कामाचे भूमिपूजन करण्यासाठी नगरसेवक प्रयत्नशील आहेत. विकास कामाच्या उद्घटनासाठी महापौरांची परवानगी आवश्यक असते. महापौरांच्या स्वाक्षरीने संबंधित विभागाला कळविले जाते. त्यानुसार संबंधित विभागाकडून उद्घाटनाची तयारी केली जाते. पण, महापौर स्वाक्षरीच करत नाहीत. पत्र स्वीकारुन त्याला केराची टोपली दाखविली जाते. त्यामुळे नगरसेवकांची अडचण झाली आहे. पाठपुरावा करुन केलेले काम उद्घाटन होत नसल्याने नगरसेवकांमध्ये संताप आहे.

राष्ट्रवादीचे कासारवाडीतील नगरसेवक श्याम लांडे यांच्या पुढाकारातून कासारवाडीत शाळा बांधण्यात आली. लांडे यांनी शाळा इमारतीसाठी तत्कालीन राज्यसभा खासदार, अभिनेत्री रेखा यांच्याकडून सव्वा दोन कोटी रुपयांचा निधी मिळविला. या शाळेचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रेखा यांच्याहस्ते उद्घाटन करण्याची मागणी नगरसेवक लांडे यांनी महापौरांकडे केली. रेखा यांच्या हस्ते उद्घटन करण्याबाबतचे पत्र स्वीकारले पण अजितदादांचे पत्र स्वीकारले नाही. दोघांच्या हस्ते उद्घाटन करण्याचे महापौरांनी शेवटपर्यंत ऐकले नाही. शाळा उद्घघाटनला परवानगी दिली नाही.

पिंपरीगावातील भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी प्रभागातील विकास कामांचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्याची मागणी महापौरांकडे केली. पण, महापौर ढोरे यांनी ते पत्र स्वीकारले. पण, ते संबंधित विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविलेच नाही. तर, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे यांच्या प्रभागातील बहुउद्देशीय सभागृहाच्या उद्घाटनालाही वेळ दिला नाही आणि पत्रही स्वीकारले नाही.

विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वपक्षातीलच पण राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेल्या नगरसेवकांच्या प्रभागातील उद्घाटनाला परवानगी दिली जात नाही. पत्र स्वीकारले जाते. पण, पुढील कार्यवाहीसाठी पाठविले जात नाही. विकासकामांचा नगरसेवकांना फायदा होऊ नये यासाठी नाकेबंदी करण्यास सुरुवात केल्याचा आरोप होत आहे.   पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने झालेल्या विकासकामांची उद्घाटने करायाला महापौर परवानगी देत नसल्याने नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी आहे. भाजपचा हुकुमशाही पद्धतीने कारभार सुरु असल्याचा आरोप केला जात आहे. राज्य घटनेत सत्तापक्ष, विरोधी पक्ष सर्वांना न्याय देण्याची भूमिका आहे. मग, महापौरांना ती मान्य नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला. दरम्यान, पाच वर्षात भाजपने नगरसेवकांकडून सर्वसाधारण सभेसमोर विचारले जाणारे प्रश्न स्वीकारणे देखील बंद केले आहे. राष्ट्रवादीची सत्ता असताना तत्कालीन शिवसेना नगरसेविका सुलभा उबाळे यांच्यापत्रावर तत्कालीन विरोधी पक्षनेते नारायण राणे यांच्या हस्ते मिनाताई ठाकरे उद्यानाचे उद्घाटन केले होते. पण, पहिल्यांदाच सत्तेत आलेल्या भाजपने आम्ही म्हणू तसाच  कारभार होणार अशी दादागिरीची भूमिका घेतल्याचे दिसून येते.

अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे म्हणाले, ”प्रभागातील बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन करायचे आहे. त्यासाठी पत्र घेऊन महापौर कार्यालयात गेलो होतो. महापौरांच्या मुलानेच इतर नगरसेवकांची पत्रे आणा. त्यानंतर तुम्हाला वेळ देऊ असे सांगितले. साधे पत्रही स्वीकारले नाही. त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांने ते पत्र तिथेच फाडले. राष्ट्रवादीत प्रवेश केला असल्यामुळेच पत्र स्वीकारले नाही आणि वेळही दिली नाही”.

पिंपळेनिलखचे भाजप नगरसेवक तुषार कामठे म्हणाले, ”प्रभागातील विकास कामांचे उद्घाटन करण्यासाठी वेळ देण्याकरिता महापौरांना विनंती करत आहे. त्यांनी दोनवेळा दुर्लक्ष केले. आता पुन्हा एकदा पत्र देऊन वेळ देण्याची विनंती करणार आहे”.

याबाबत महापौर उषा ढोरे म्हणाल्या, ”असे काही नाही. सर्वांच्या प्रभागातील विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजनासाठी वेळ दिला जाणार आहे. एक नगरसेवक पत्र देतो. पण, एका प्रभागात चार नगरसेवक आहेत. त्यामुळे उर्वरित तीन नगरसेवकांना विश्वासात घेतले पाहिजे. दोन दिवसात नगरसेवकांकडून पत्र घेऊन ती पत्रे पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे पाठविणार आहे”.

 …विरोधक ‘शनिवारवाडा’ विकत घ्यायची मागणी करतील!

भाजपने फेब्रुवारी महिन्याची शेवटची सभा 17 मार्च पर्यंत तहकूब केली. नगरसेवकांचा कार्यकाळ 13 मार्च रोजी संपणार आहे. त्यानंतर प्रशासक येईल. त्यामुळे ही सभा होऊ शकणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 15 वर्षातील विकास आणि भाजपच्या 5 वर्षातील विकासावर चर्चा करण्याचे आव्हान भाजपने दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने ते आव्हान स्वीकारले. महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार स्थायी समितीच्या चार सदस्यांनी मागणी केल्यास विशेष सभा बोलवावी लागते. त्यानुसार राष्ट्रवादीच्या स्थायीतील चार सदस्यांनी नियमानुसार विशेष सभा बोलविण्याची लेखी पत्राद्वारे महापौरांकडे मागणी केली. सुरुवातीला महापौरांनी सभा घेण्यास होकार दिला. पण, पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्ष ‘शनिवारवाडा’ विकत घ्यायची मागणी करेल असे सांगत सभा घेण्यास स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे महापौरांना नियमानुसार कारभार करायचा नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.