Pimpri News : स्मार्ट सिटीत भाजप आमदाराच्या ‘स्मार्ट चोऱ्या’, ‘ईडी’मार्फत चौकशी करा; शिवसेनेची मागणी

एमपीसी न्यूज – भाजपचे विधानपरिषदेतील आमदार प्रसाद लाड यांचे कुटूंबीय संचालक असलेल्या क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्राव्हेट लिमिटेड या कंपनीने पिंपरी- चिंचवड स्मार्ट सिटीतील विविध कामांमध्ये घोटाळा केला आहे. 520 कोटीच्या कामात या कंपनीने 110 कोटी रुपये लाटल्याचा आरोप करत क्रिस्टलच्या सर्व व्यवहाराची कॅगमार्फत चौकशी व्हावी. तसेच आमदार लाड यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी) मार्फत चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना पिंपरी- चिंचवड कार्यकारिणीने केली आहे.

स्मार्ट सिटीतील गैरव्यवहारांचा भांडाफोड करण्यासाठी शिवसेनेने आज (शनिवारी) आकुर्डीतील शिवसेना भवनात पत्रकार परिषदे घेतली. यावेळी महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख सचिन भोसले, जिल्हा उपसंघटिका वैशाली मराठे, नगरसेविका मीनल यादव, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, चिंचवड विधानसभा संघटिका अनिता तुतारे आदी उपस्थित होते.

सुलभा उबाळे म्हणाल्या, पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी बरोबर क्रिस्टल इंटिग्रेटेड कंपनीने ठेकेदार, उपठेकेदार म्हणून महत्वाचे व्यवहार केले आहेत. क्रिस्टल कंपनीमध्ये भाजप आमदार प्रसाद लाड यांची पत्नी, मुलगा, मुलगी आणि भाऊ असे चार जण संचालक मंडळावर आहेत. सत्तेचा दुरुपयोग करून यांनी ठेके मिळविले आहेत.

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीने 350 कोटी रुपयांची एक निविदा प्रसिद्ध केली होती. ही निविदा 520 कोटी रुपयांना देण्यात आली. या निविदेत गडबड घोटाळा झाला आहे. पाणी मीटर खरेदीतच पाणी मुरत आहे. खुल्या बाजारात 10 ते 15 हजार रुपयांत मिळणारे 1 पाणी मीटर 1 लाख रुपयांना खरेदी करण्यात आले. या पाणी मीटरच्या व्यवहारातच सुमारे 72 कोटी 62 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

सर्व्हेरसाठी लागणारे एकाच कंपनीचे दर वेगवेगळे आहेत

डिझेल जनरेटर इंस्टॉलेशन करण्याचा दर महिंद्रा कंपनीने 2 कोटी 57 लाख 91 हजार इतका दिला आहे. तर, महिंद्राच्या एमआरपीमध्ये शासनाच्या पोर्टलवर त्यांचा रेट 21 लाख 26 हजार 655 रुपये इतका आहे. येथे 2 कोटी 20 लाख रुपये जास्त दिसून येतात. काम वेळेत पूर्ण न केल्यामुळे 25 ते 30 कोटी रुपये दंड लावणे अपेक्षित असताना केवळ काही लाखांचा दंड दाखवण्यात आला आहे. कोरोना सुरू होण्याच्या आधी मुदत संपलेली असताना कोरोनाचे कारण सांगून शासन निर्णयाचा उपयोग करून स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाकडून सल्लागाराने अत्यंत शिताफीने दंड वाचवला असल्याचेही ते म्हणाल्या.

ऑनलाईन Water Quality Analysis STP Monitoring System साठी लागणाऱ्या कंपनीचे Product बसविण्याचा विषय संचालक मंडळापुढे आहे. यात दर्जेदार कंपनी वगळून साध्या कंपनीकडून हे साहित्य घेऊन 10 कोटी लाटण्याचा डाव सुरू आहे. 520 कोटीच्या कामात क्रिस्टल इंटिग्रेटेड कंपनीने 110 कोटी रुपये लाटल्याचा आरोप उबाळे यांनी केली. त्यामुळे या कंपनीची चौकशी व्हावी. त्यांच्या नातलग संचालक पदावर असल्याने आमदार लाड यांची ईडी व कॅग (CAG) मार्फत चौकशी व्हावी. त्यांचे आमदार पद रद्द व्हावे; अन्यथा आम्हाला न्यायासाठी आंदोलन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष ठेकेदारीत सहभाग घेतला. तर, त्यांचे नगरसेवक पद रद्द होते. असा कायदा असताना भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या कुटुंबातील चार सदस्य असणाऱ्या कंपनीने स्मार्ट सिटी चे काम टेक महिंद्रा कंपनीकडून जॉईंट व्हेंचरमध्ये कसे घेतले?, असा सवालही उबाळे यांनी केला.

याबाबत आमदार प्रसाद लाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्या स्वीय सहाय्यकाने आमदार बैठकीत आहेत. त्यांना विचारून घेतो असे सांगितले. त्यांची प्रतिक्रिया मिळताच बातमीमध्ये अपडेट केली जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.