Pimpri News : संकटकाळात भाजपने शहरवासीयांवार ‘पे अँड पार्क’चा कर लादला : अजित गव्हाणे

नागरिकांनी 'पे अँड पार्क'साठी पैसे भरु नयेत :

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक गेल्या दीड वर्षांपासून कोरोना महामारीला सामोरे जात आहेत. कोरोना काळात सर्वांचे आर्थिक उत्पन्न घटले असून आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. या संकट काळात औद्योगिकनगरीतील कष्टक-यांना मदत करणे आवश्यक असताना महापालिकेतील सत्ताधारी भाजपने शहरवासीयांवार ‘पे अँड पार्क’चा कर लादल्याची टीका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक अजित गव्हाणे यांनी केली. तसेच नागरिकांनी ‘पे अँड पार्क’साठी पैसे भरु नयेत, असे आवाहनही त्यांनी केले.

पिंपरी-चिंचवड शहरात कालपासून ‘पे अँड पार्क’ची अंमलबजावणी सुरु झाली. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा तीव्र विरोध आहे. याबाबत राष्ट्रवादीचे नगरसेवक अजित गव्हाणे म्हणाले, शहरातील नागरिक कोरोना विरुद्धची लढाई लढत आहेत. या महामारीने अनेकांचा रोजगार हिरावून घेतला आहे. अशा परिस्थितीत कुटुंब कसे चालवायचे असा प्रश्न कष्टक-यांसमोर पडला आहे. पिंपरी-चिंचवड ही औद्योगिक, कष्टक-यांची नगरी आहे. शहरात देशाच्या कानाकोप-यातील नागरिक आपल्या उदरनिर्वाहासाठी आले आहेत. कोरोना काळात कष्टक-यांचा रोजगार गेला.

कोरोना काळात सर्वांचे आर्थिक उत्पन्न घटले आहे. आर्थिक परिस्थिती विस्कळीत झाली आहे. या संकट काळात नागरिकांना मदत करणे आवश्यक आहे. असे असताना भाजपने शहरवासीयांना भुर्दंड लावण्याचे काम केले आहे. पे अँड पार्कच्या नावाखाली नागरिकांच्या खिशाला कात्री लावली आहे. सुरुवातीला काही रस्त्यांवर पे अँड पार्क सुरु केले असून टप्या टप्याने शहरातील सर्वंच रस्त्यांवर पार्किंगसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. या निर्णयाचा आम्ही निषेध करतो.

महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना अजितदादांच्या नेतृत्वाखाली शहराचा चेहरा मोहरा बदला. मागच्या 15 वर्षाच्या काळात शहराला वेगळी ओळख मिळाली आहे. परंतु, मागील साडेचार वर्षात शहर मागे पडले आहे. सत्ताधारी भाजपकडून मागील साडेचार वर्षात चुकीची कामे केली जात आहेत. शहरातील नागरिकांनी पे अँड पार्कला सहकार्य करु नये, असे आवाहनही नगरसेवक गव्हाणे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.