Pimpri News: काळेवाडी परीसरातील पवना नदीपात्रात भराव टाकणाऱ्या व मैलामिश्रित सांडपाणी नदीत सोडणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची मागणी 

एमपीसी न्यूज: काळेवाडी येथील पवना नदीपात्रात पूररेषेत बेकायदेशीर भराव टाकणाऱ्या व मैलमिश्रित सांडपाणी नदीत सोडून नदी प्रदूषित करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी (Pimpri News) अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिध्दीकीभाई शेख यांनी आज (27 जुलैला) पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उप प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे केली आहे.

अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिध्दीकीभाई शेख यांनी दिलेल्या निवेदनात म्हटंले आहे की, काळेवाडी , बीआरटी रोड च्या लागत परिसरामध्ये नदीच्या पात्रात भराव टाकून अनधिकृत बांधकामे केलेली आहेत. त्यामध्ये वोर्कशॉप , फॅब्रिकेशन , हॉटेल्स , मंगल कार्यालये , गोडाउन्स अशा आस्थापनांचा समावेश आहे . शहरात काही जणांनी पर्यावरणाचा ऱ्हास करण्याचा ध्यास घेतलेला आहे . प्रदूषणच्या नियमांची पायमल्ली करीत अनेकांनी नियम धाब्यावर बसवलेले आहेत.

 

काळेवाडी स्मशानभूमी च्या मागे एका ठेकेदारामार्फत खिल्लारे इन्फ्रस्टकचर लिमीटेड या कंपनीकडून नदीपात्रात काम चालू आहे.परंतु त्यांच्याकडून प्रदूषण व पर्यावरण विषयक नियमांचे उल्लंघन केले जात आहे. (Pimpri News) काळेवाडी स्मशानभूमी पासून ते एम्पायर इस्टेट पुलाच्या दिशेने1 किमी अंतरापर्यंत पवना नदीपात्रात पुररेषेमध्ये पोकलेन व जेसीबीच्या साहाय्याने मुरुमचा बेकायदेशीर भराव टाकण्यात येत आहे. या भरावामुळे नदीचा काही भाग अक्षरशः बुजुन गेलेला आहे. यामुळे पवना नदीचे मूळ पात्र अरुंद होत असून पावसाळ्यामध्ये येणाऱ्या पाण्यामुळे परिसरात पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते .
पवना नदीपात्रालगत पूररेषेमध्ये भराव टाकून व्यावसायिक अतिक्रमण करण्याचे प्रकार सर्रासपणे चालू आहेत. पवना नदीपात्रात ठेकेदाराकडून काम सुरु असून नागरी मैलमिश्रित सांडपाणी पंपाने उपसून पवना नदीमध्ये सोडले जात आहे. काही दिवसांपूर्वीच शहरातील इंद्रायणी ,पवना या दोन्ही नद्यांचे प्रदूषण चिंताजनक असल्याचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केला होता. (Pimpri News) याचे गांभीर्य पिंपरी-चिचंवडच्या पर्यावरण विभागाला नसल्याचे निदर्शनास येत आहे. यापूर्वीही अनेकांनी शहरातील नदी प्रदूषण संदर्भात अनेक तक्रारी केलेल्या आहेत. परंतु संबंधित यंत्रणांकडून नदी प्रदूषणच्या तक्रारींकडे कानाडोळा करण्यात आलेला आहे.

 

काळेवाडी पवना नदीपात्रात भराव टाकून तसेच राडारोडा टाकून व मैलमिश्रित सांडपाणी पवना नदीत सोडून ठेकेदाराने पाण्यातील जीवसृष्टीला व पर्यावरणाला धोका निर्माण होईल असे कृत्य केल्याने जल (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) कायदा, 1974 , पर्यावरण संरक्षक कायदा 1986 , महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम आणि महाराष्ट्र महापालिका अधिनियम नुसार संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी (Pimpri News) अपना वतन संघटनेकडून करण्यात येत आहे. सदर मागणीची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कडक कारवाई करावी.

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकच्या पर्यावरण विभागाचे पर्यावरण अभियंता यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, संबंधित प्रभाग कार्यालयाचे अतिक्रमण विभागाने व बीट निरीक्षक यांनी यावर कारवाई करायला हवी. ही त्यांची जबाबदारी आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.