Pimpri News: महापालिका थेटपद्धतीने खरेदी करणार साडेतेरा लाखांची फायर बाईक; गल्लीबोळ, झोपडपट्यांमधील आग विझविण्यासाठी होणार उपयोग

एमपीसी न्यूज – जिथे आगाची बंब पोहचू शकत नाही अशा अरुंद गल्लीबोळात आणि झोपडपट्यांतील आग विझविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका तीन फायर फायटिंग मोटार बाईक खरेदी करणार आहे. एका बाईकची किंमत 13 लाख 48 हजार रुपये आहे. आरएमएस फायर सेफ्टी सर्व्हिसेस (इं) या कंपनीकडून थेटपद्धतीने तीन बाईक खरेदी केल्या जाणार असून त्यासाठी 40 लाख 44 हजार रुपये खर्च येणार आहे.

”पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे आतापर्यंत चारचाकी फायरच्या गाड्या होत्या. छोट्यातील-छोटी आणि मोठ्या चारचाकी गाड्या होत्या. परंतु, कितीही छोटी गाडी घेतली. तरीही ती चारचाकी चिंचोळ्या गल्लीबोळात जाऊ शकत नाही. तिथे दुचाकीच जाऊ शकतात. विशेषता झोपडपट्यांमधील आग विझविण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. गल्लीबोळ, झोपडपट्यांमधील आग विझविण्यासाठी जाता यावे, यासाठी फायर फायटिंग मोटार बाईक केली जाणार आहे. पुण्यासह अन्य महापालिकांकडे या बाईक असल्याचे” महापालिका अग्निशमन दलाचे प्रमुख किरण गावडे यांनी सांगितले.

…अशी असेल फायर फायटिंग मोटार

या फायर फायटिंग मोटार बाईकमध्ये 30 मीटरचा पाईप असणार आहे. पुढे रोजल असणार असून दोन फायरमन दुचाकीवर बसू शकतील. साईडने 20 लिटरच्या दोन पाण्याच्या टाक्याही असणार आहेत. 40 लीटर पाण्याची फायर फायटिंग यंत्रणा बसवलेली आहे. त्याचबरोबर तातडीच्या कॉलवर जाण्यासाठी मोठ्या गाड्या जातात. त्यावेळी रस्त्यांवरील वाहतुकीतून वाट काढण्याच्या दृष्टीने या फायटरचा उपयोग होईल. कॉलवर जाण्यासाठी मोटार बाईक पुढे जात रस्ता मोकळ्या करुन देतील. त्यापाठोपाठ मोठे बंब जातील. बंब आग विझवण्याची तयारी करण्यास पाच मिनिटांचा वेळ लागतो. तो या बाईकला लागणार नाही. ती स्टॅंडला लावून आग विझवण्याचे काम लगेचच सुरु होणार असल्याने आग लवकर आटोक्यात येईल.

थेट पद्धतीने खरेदी करणार तीन बाईक

अशी प्रकारची वाहने उत्पादीत करणारी एकमेव कंपनी आरएमएस फायर सेफ्टी सर्व्हिसेस (इं) प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून गव्हरमेंट ई मार्केट दराने (Gem) निविदा न मागविता, करारनामा न करता थेट पद्धतीने महापालिका फायर फायटिंग मोटार बाईक खरेदी करणार आहे. एका बाईकची किंमत 13 लाख 48 हजार रुपये आहे. त्यासाठी 40 लाख 44 हजार रुपये खर्च येणार असून स्थायी समिती समोर प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.