Pimpri News: महापालिका मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करणार

एमपीसी न्यूज – मालमत्ताकराच्या थकबाकीसह संपूर्ण कराचा एक रक्कमी भरणा करणा-या मालमत्ताधारकांरिता महापालिकेमार्फत अभय योजना राबविण्यात येत आहे. संपूर्ण कराची रक्कम भरणा करणा-यांना महापालिका शास्तीकराच्या (दंड) रकमेत सवलत दिली जाणार आहे. आजपासून ही अभय योजना राबविण्यात येत असल्याचे कर आकारणी व करसंकलन विभागाचे प्रमुख नीलेश देशमुख यांनी सांगितले. ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात मालमत्ता कराच्या थकीत रक्कमा आहेत. अशा थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्तीची कार्यवाही करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सध्या 5 लाख 61 हजार मालमत्तांची नोंदणी आहे. त्यात व्यावसायिक, निवासी, संमिश्र मालमत्ता आहेत. या मालमत्तांना महापालिकेकडून कर आकारणी केली जाते. करसंकलन विभागामार्फत मालमत्ताधारकांसाठी 22 जानेवारीपासून महापालिका शास्ती (दंड) रक्कममध्ये सवलत देण्याची अभय योजना राबविण्यात येत आहे. विहित मुदतीत मालमत्ताकर न भरणा-या मालमत्ता धारकांना प्रती महा 2 टक्के दराने मालमत्ताकर बिलामध्ये महापालिका शास्ती (दंड) म्हणून आकारण्यात येत आहे.

मालमत्ताकराची थकबाकीसह संपूर्ण कराचा एक रक्कमी भरणा-या करणा-या मालमत्ताधारकांसाठी अभय योजना राबविण्यात येत आहे. जे मालमत्ताधारक 31 जानेवारीपूर्वी संपूर्ण कर रकमेचा भरणा करतील. त्यांना एकूण महापालिका शास्ती (दंड) रकमेच्या 90 टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच 1 ते 28 फेब्रुवारी 2022 या कालावधीमध्ये संपूर्ण मालमत्ताकराचा भरणा करणा-यांना महापालिका शास्ती (दंड) रकमेच्या 80 टक्के आणि 1 ते 31 मार्च 2022 या कालावधीमध्ये भरणा करणा-या मालमत्ताधारकांना महापालिका शास्ती (दंड) रकमेच्या 75 टक्के सवलत देण्यात येणार असल्याचे विभागप्रमुख देशमुख यांनी सांगितले.

नागरिकांच्या सोईच्या दृष्टीने सर्व करसंकलन विभागीय कार्यालय सार्वजनिक व साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी सुरु राहणार आहेत. मालमत्ताधारकांनी कराची रक्कम रोख, धनादेश, डिमांड ड्राफ्टद्वारे भरणा करता येईल. तसेच महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर मालमत्ता कर भरण्याची ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहे. ज्या मालमत्ताधारकांनी अद्यापही मालमत्ता कराचा भरणा केलेला नाही. अशा मालमत्ताधारकांनी थकबाकीसह संपूर्ण मालमत्ताकराची रक्कम भरणा करुन अभय योजनेचा लाभ घाव्या. ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात मालमत्ता कराच्या थकीत रक्कमा आहेत. अशा थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्तीची कार्यवाही करण्यात येणार असल्याचा इशारा देशमुख यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.