Pimpri News: सत्ताधारी भाजपच्या उधळपट्टीमुळे महापालिकेची आर्थिक स्थिती ढासळली – संजोग वाघेरे‌

एमपीसी न्यूज – श्रीमंत महानगरपालिका अशी ओळख पिंपरी -चिंचवड महापालिकेची आहे. परंतु, सन 2022-23 या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकातून पालिकेची आर्थिक परस्थिती ढासळली आहे, हे अधोरेखित झाले आहे. पहिल्यांदाच अंदाजपत्रकात 627 कोटी रुपयांची मोठी घट झालेली आहे. चुकीचे नियोजन, अनावश्यक कामे आणि वारेमाफ उधळपट्टी करून शहराला आर्थिक संकटाकडे घेऊन जाण्याचं काम महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाने केले आहे, अशी टीका माजी महापौर संजोग वाघेरे‌ यांनी केली.

अंदाजपत्रकातून सत्ताधारी आणि प्रशासनामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेची आर्थिक परस्थिती बिकट होत असल्याचा आरोप करताना संजोग वाघेरे‌ म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वात श्रीमंत महानगरपालिका अशी ओळख आहे. दरवर्षी अंदाजपत्रकात वाढ होते. परंतु, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या अंदाजपत्रकात एकूण 627 कोटी रुपयांची घट झालेली आहे. ही बाब महापालिकेची ढासळलेली आर्थिक स्थिती दर्शविणारी आहे. मागील पाच वर्षे महानगरपालिकेत सत्तेवर असलेल्या सत्ताधारी भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळे, वारेमाफ उधळपट्टीतून आर्थिक परस्थिती ढासळली आहे.

उत्पन्न घटले असताना खर्चावर मर्यादा आणणे अपेक्षित होते

त्याकरिता कोरोना काळात उत्पन्न घटल्याचे कारण दिले जात आहे. परंतु, उत्पन्न घटले असताना खर्चावर मर्यादा आणणे अपेक्षित होते. महापालिकेतील सत्ताधारी व अधिकारी यांनी खर्च आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला नाही. उलट वारेवाप खर्च होत आहे. चुकीच्या अनावश्यक कामांवर कोटी कोटींची उधळपट्टी होते. आवश्यकता गल्ली-बोळात सिमेंट क्रॉकीटचे रस्ते केले जात आहे. यातून रस्त्यावर होणारा खर्चाबरोबर इतरसेवा विस्कळीत होऊन त्या खर्चाचा ताण वाढतो आहे. महापालिकेत सत्ता मिळालेल्या भाजपच्या मंडळींना पुन्हा महापालिकेत आपली सत्ता येणार नाही, ही खात्री आहे. त्यामुळे केवळ मोठ मोठी कामे काढण्याचा सपाटा त्यांनी लावलेला आहे. भाजपच्या या कार्यपध्दतीचा भुर्दंड पिंपरी-चिंचवड शहराला आणि येथील करदात्यांना सहन करावा लागणार आहे. महापालिका आणि शहरवासीयांना आर्थिक संकटाकडे घेऊन जाण्याचे काम सत्ताधारी म्हणून भाजपने केल्याचे यावरून स्पष्ट होते, असे वाघेरे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.