Pimpri News: महापालिकेचा उपक्रम; रिकाम्या प्लास्टीक बाटल्या द्या अन् चहा, वडापाव घ्या !

पाच बाटल्या जमा करणा-याला एक कप चहा तर दहा बाटल्या जमा करणा-याला एक वडापाव

एमपीसी न्यूज – रस्त्यात, इतरत्र पडलेल्या शितपेये अथवा पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्या प्लास्टीक बाटल्या एकत्रित गोळा करण्यासाठी महापालिकेने प्रोत्साहनपर अनोखा प्लास्टीक व्यवस्थापन उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात शहरातील छोटे हॉटेल व्यावसायिक अथवा टपरी, हातगाडी विक्रेते यांना सहभागी करून घेतले जाणार आहे. कचरावेचक अथवा अन्य नागरिकांनी पाणी व शितपेयाच्या रिकाम्या प्लास्टीक बाटल्या गोळा करून या विक्रेत्यांकडे जमा केल्यास या मोबदल्यात त्यांना चहा आणि वडापाव मिळणार आहे. पाच बाटल्या जमा करणा-या व्यक्तीला एक कप चहा तर दहा बाटल्या जमा करणा-या व्यक्तीला एक वडापाव दिला जाणार आहे. तर, विक्रेत्यांना महापालिकेकडून प्रतिपूर्ती रक्कम दिली जाणार आहे. यासाठी महापालिकेने अर्ज मागविले आहेत.

शहरातील नागरिक शितपेये अथवा पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टीक बाटल्यांचा वापर करून रिकाम्या बाटल्या इतरत्र टाकतात. त्यामुळे परिसर अस्वच्छ दिसतो. यामुळे पर्यावरणाचीही हानी होते. याकरिता महापालिकेने प्रोत्साहनपर अनोखा प्लास्टीक व्यवस्थापन उपक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे. कचरावेचक अथवा अन्य नागरिकांनी पाणी व शितपेयाच्या रिकाम्या प्लास्टीक बाटल्या गोळा करून त्या छोटे हॉटेल व्यावसायिक अथवा टपरी, हातगाडी विक्रेते यांच्याकडे जमा करायच्या. त्या मोबदल्यात बाटल्या जमा करणा-या व्यक्तीला चहा, नाष्टा, जेवण या स्वरूपात मोबदला देण्याचा उपक्रम महापालिकेने राबवायचे ठरवले आहे. पाच बाटल्या जमा करणा-या व्यक्तीला एक कप चहा तर दहा बाटल्या जमा करणा-या व्यक्तीला एक वडापाव संबंधित हॉटेल व्यावसायिक अथवा विक्रेत्याने द्यावयाचा आहे.

याकरिता इच्छूक असलेले शहरातील छोटे हॉटेल व्यावसायिक अथवा टपरी, हातगाडी विक्रेते यांना महापालिकेसोबत काम करावे लागणार आहे. संकलीत केलेल्या रिकाम्या प्लास्टीक बाटल्यांचे वजन महापालिकेकडे हस्तांतरीत केल्यानंतर चहा, नाष्टा व जेवण यापोटी केलेल्या खर्चाची प्रतिपूर्ती ही निवड केलेले छोटे हॉटेल व्यावसायिक अथवा टपरी-हातगाडी विक्रेते यांना करण्यात येणार आहे. यासाठी या व्यावसायिकांना महापालिकेकडे अर्ज करून नोंदणी करणे आवश्यक राहणार आहे. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत आरोग्य मुख्य कार्यालय, दुसरा मजला येथे नोंदणी करून अर्ज सादर करता येणार आहे. नोंदणी करणा-या हॉटेल व्यावसायिक अथवा टपरी, हातगाडी विक्रेत्याकडे अधिकृत अन्न परवाना तसेच व्यवसायाच्या ठिकाणी स्वच्छता असणे गरजेचे राहणार आहे.

प्लास्टीकच्या पाच बाटल्या जमा करणा-याला एक कप चहा मिळणार आहे. विक्रेते, हॉटेलचालकाला 10 रुपयांचा मोबदला देणार आहे. तर, दहा बाटल्या जमा केल्यास एक वडापाव दिला जाणार आहे. त्यापोटी महापालिका हॉटेल मालकाला 15 रूपये देणार आहे. शहरात सगळीकडे हा उपक्रम राबविण्याचा आमचा मानस आहे. यामुळे शहर प्लास्टीकमुक्त होण्यास मदत होईल असा विश्वास आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के.अनिल रॉय यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.