Pimpri News : राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे, शितल काटे एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांसाठी देणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे, तसेच त्यांच्या पत्नी नगरसेविका शितल काटे एक महिन्याचे वेतन कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांचा मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस देणार आहेत. याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना पत्र पाठवून त्यांनी नगरसेवकपदाचे दोघांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यास सांगितले आहे.

महाराष्ट्रातील कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील भागात अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये अनेक नागरिकांचे संसार, दुकान, शेती यांचे पुराच्या पाण्यामुळे नुकसान झाले आहे. तर, काही ठिकाणी दरड कोसळून जीवितहानी झाली आहे. यात कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. यापूर्वीही चक्रीवादळ यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकण व कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार व खासदार यांचे एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचे जाहीर केले आहे. आपणही समाजाचे काही तरी देणे लागतो ही बाब विचारात घेत मी माझे व माझ्या पत्नीचे पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे मिळणारे एक महिन्याचे वेतन कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांचा मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस देणार आहोत.

प्रशासनाने आमचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस द्यावे. तसेच शहरातील सर्वपक्षीय नगरसेवकांनी आपले एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांसाठी द्यावे, असे आवाहनही नगरसेवक काटे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.