Pimpri News: महापौर निधीनंतर आता क्रीडा विभागाचा निधी वळविला स्मार्ट सिटीसाठी

निधी महापालिकेचा अन् खरेदी करणार स्मार्ट सिटी!

मपीसी न्यूज – स्मार्ट सिटीच्या कारभारावर विविध आक्षेप घेतला जात असतानाही पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने महापौर निधीनंतर आता क्रीडा व्यायाम साहित्य खरेदीचा निधी स्मार्ट सिटीकडे वळविला आहे. तब्बल 70 लाख रुपयांचा निधी वळविला असून त्यातून ओपन जिम, विविध खेळाचे साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. महापालिकेच्या निधीतून स्मार्ट सिटी साहित्य खरेदी करणार आहे. याबाबतच्या तरतूद वर्गीकरणाला सर्वसाधारण सभेत उपसूचनेद्वारे मान्यता दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे. नियमित व्यायामाची सवय लागावी. या उद्देशाने महापालिकेच्या मोकळ्या जागा, उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणी नागरिकांकरिता ओपम जिम, विविध खेळाचे साहित्य विषयक काम प्रगतीपथाव आहे. या कामाला यापूर्वीच प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. हे काम तातडीने करणे आवश्यक आहे. पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी स्थापत्य विभागामार्फत 16 मे 2019 मधील निविदा अटी-शर्तीनुसार महापालिकेच्या मोकळ्या जागा, उद्याने, सार्वजनिक ठिकाणी नागरीकांकरिता ओपम जिम, विविध खेळाचे साहित्य विषयक कामांचा सन 2021-22 च्या अंदाजपत्रकात समावेश केला आहे.

विशेष बाब म्हणून पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी अंतर्गत या निविदेतून चालू कामामध्ये सन 2021-22 च्या अंदाजपत्रकात वाढ केली. त्यासाठी क्रीडा विभागाच्या तरतूदीचे वर्गीकरण केले. क्रीडा व्यायाम साहित्य खरेदी या लेखार्शिषावर 4 कोटी रुपयांची तरतूद आहे. त्यातील 70 लाख रुपयांची तरतूद पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी या लेषाशिर्षावर वळविण्यास उपसूचनेद्वारे मान्यता दिली. या निधीतून स्मार्ट सिटी क्रीडा साहित्य खरेदी करणार आहे. महापालिकेच्या निधीतून स्मार्ट सिटी साहित्य खरेदी करणार आहे.

दरम्यान, यापूर्वीही महापौर निधीतील एक कोटी रुपयांचा निधी स्मार्ट सिटीकडे वळविला होता. त्यातून शहरात एलईडी डेकोरेटिव्ह ट्रॅफिक सिग्नल बसविले जाणार आहेत. स्मार्ट सिटीच्या कारभाराबाबत विविध आक्षेप घेतले जात आहेत. स्मार्ट सिटीच्या खरेदीबाबत गंभीर स्वरुपाचे आरोप होत असताना सत्ताधा-यांकडून स्मार्ट सिटीकडेच निधी वळविला जात आहे. त्यांच्यामार्फत काम केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.