Pimpri : महापालिकेतील कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रंगली श्रेयवादाची लढाई

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी शासनाने मान्यता दिली. याबाबत आमदार अण्णा बनसोडे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. तर भाजपचे सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार यांनी ‘हा विषय भाजपने स्थायी समिती, सर्वसाधारण समितीमध्ये मांडला असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे मार्गी लागला असल्याचे सांगितले. सत्ताधारी भाजप आणि विरोधक यांच्या एकाच निर्णयावरील वेगवेगळ्या भूमिकांमुळे दोन्ही पक्षांमध्ये श्रेयवादाची लढाई रंगली आहे.

पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी सोमवारी (दि. 23) पत्रकार परिषदेमध्ये महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केल्याची घोषणा केली. तसेच सातवा वेतन आयोग लागू करणारी पिंपरी चिंचवड महापालिका ही राज्यातील पहिली महापालिका असल्याचा दावा केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्या प्रयत्नामुळेच हा निर्णय झाला असून याचे संपूर्ण श्रेय राष्ट्रवादी कॉंग्रेसचे असल्याचे सांगितले. त्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी महापालिकेसमोर गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला.

एकनाथ पवार म्हणाले, “22 फेब्रुवारी 2019 रोजी भाजपने महापालिकेतील कर्मचा-यांना सातवा वेतन अयोग लागू करण्याचा विषय सर्वसाधारण सभेमध्ये मांडला होता. त्यांनतर 11 जून 2019 रोजी या निर्णयावर प्रधान सचिवांची स्वाक्षरी झाली. आचार संहिता लागण्याच्या काळामध्ये या विषयाची फाईल तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होती. मात्र, आचारसंहिता लागल्याने हा विषय तसाच राहिला. आता महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांनी ही फाईल काढून श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.

शहर भाजपाच्या पाठपुराव्यानेच ही फाईल पूर्णत्वास जाऊन कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळाला आहे. महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळावे, यासाठी शहर भाजपाने वारंवार प्रयत्न केला आहे. श्रेय लाटण्याची राष्ट्रवादीची ही जुनी परंपरा आहे. शहरातील कर्मचारी संघटनेला आकर्षित करण्याचा हा राष्ट्रवादीचा केविलवाणा प्रयत्न आहे. भाजप महापालिका कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे कायम उभा राहिला आहे, असेही पवार म्हणाले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचा-यांना सातवा वेतन अयोग लागू करण्याचे श्रेय नेमके कुणाचे यावरून शहर राष्ट्रवादी आणि भाजपामध्ये चांगलीच जुंपली आहे. सातवा वेतन आयोगाचा लाभ महापालिकेतील 8 हजार 300 कर्मचाऱ्यांना होणार आहे. महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये 17 ते 22 टक्के वाढ होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.