Pimpri: पाणी, शास्तीकर, रिंगरोड, अवैध बांधकामाचा प्रश्न मार्गी लावणार -अजित पवार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर वेगाने वाढत आहे. त्यामुळे शहरासाठी पाणी आरक्षण कोटा वाढविणार आहे. शहरातील प्रश्नांची मला जाणीव आहे. शास्तीकर, अवैध बांधकामे, रिंगरोड, साडे बारा टक्के परताव्याचा प्रश्न आहे. सर्वांना विश्वासात घेऊन सामंजस्याने शहरातील हे प्रलंबित प्रश्न सोडविण्यात येणार असल्याचे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (शनिवारी) सांगितले.

राज्यात सत्ता आल्यानंतर पवार आज पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. आकुर्डीत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, शहरातील सर्व प्रश्नांची मला जाण आहे. शहराचे प्रश्न सोडविताना कोणतेही राजकारण आणणार नाही. सरकारमधील मित्र पक्ष शिवसेना, काँग्रेसच्या नेत्यांना विश्वासात घेऊन कामे केली जातील. सामंजस्याने शहरातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यात येणार आहे.

शहर झपाट्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार वाढीव पाण्याची देखील आवश्यकता आहे. शहरासाठी पाणी कोटा वाढवून घेणार आहे. आंद्रा-भामा आसखेड, पवना धरणातून पाणी आणण्याचा प्रयत्न करणार आहे. अवैध बांधकामे, रिंगरोड, शास्तीकर असे राज्य सरकारशी संबंधित सर्व प्रश्न सोडविणार असल्याचे सांगत अजित पवार म्हणाले, केंद्र सरकारशी निगडीत प्रश्न देखील मार्गी लावले जातील. मेट्रोचे काम पुर्णत्वाला नेण्यात येईल. शहरातील प्रलंबित प्रश्नांची यादी तयार केली जाईल. प्राधान्यक्रम ठेऊन कामे केली जातील. कोणाबद्दल आकस न ठेवता विकासकामे करणार आहे.

महापालिका प्रशासनात मरगळ आली आहे. अधिकारी आपल्या सोईच्या दृष्टीने कामकाज करत आहेत. महापालिकेला सक्षम आयुक्त देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.