PM Address To Nation : पंतप्रधान मोदी सायंकाळी पाच वाजता जनतेला संबोधित करणार

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (सोमवारी) सायंकाळी पाच वाजता जनतेला संबोधित करणार आहेत. सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख उतरणीला लागला असला तरी दररोजचा मृतांचा आकडा मात्र धडकी भरवणारा आहे. त्यामुळे देशातील सध्याच्या परिस्थितीवर पंतप्रधान मोदी काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

देशात दुसऱ्या कोरोना लाटेच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांत निर्बंध लागू करण्यात आले होते. अनेक ठिकाणी हे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. देशातील कोरोनाचा संसर्ग देखील उतरणीला लागला आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

गेल्या 24 तासांत भारतात एक लाख दैनंदिन नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली आहे. मागील 61 दिवसातील ही निचांकी रुग्णवाढ आहे. सलग 25 व्या दिवशी नव्या बाधितांपेक्षा दैनंदिन बऱ्या होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सक्रीय कोविड बाधितांच्या संख्येत घट होऊन ती 14,01,609 वर पोहचली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.