Pune News : पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजनेस मान्यता

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका हद्दीतील नियमितपणे निवासी मिळकतकर आणि गलिच्छ वस्ती निर्मूलन सेवाशुल्क भरणाऱ्या कुटुंबांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजना राबविण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, शहरातील निवासी करदाते आणि गलिच्छ वस्ती निर्मूलन सेवाशुल्क भरणाऱ्या 9 लाख 47 हजार 609 कुटुंबांना ही योजना लागू असेल. प्रती कुटुंब 42 रुपये 48 पैसे प्रीमीयम दि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीला द्यावे लागणार आहेत. हा दर गेल्या वर्षी पेक्षा 19 रुपये 52 पैशांनी कमी आहे. या वर्षी चार कोटी दोन लाख चौपन्न हजार रुपयांच्या तरतुदीला मान्यता देण्यात आली.

रासने पुढे म्हणाले, नियमितपणे निवासी मिळकतकर किंवा गलिच्छ वस्ती निर्मूलन सेवाशुल्क भरणाऱ्या मिळकतकर धारक पती किंवा पत्नी किंवा आई किंवा वडील यांचा अपघाती मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास पाच लाख रुपयांची विमा रक्कम मिळणार आहे. मिळकतधारकावर अवलंबून असलेल्या 26 वर्षांखालील पहिल्या दोन पालकांना अडीच लाख रुपयांचा विमा रक्कम मिळणार आहे.

कुटुंबातील व्यक्तीला अपघात झाल्यास एका वर्षात एका व्यक्तीला किंवा कुटुंबातील सर्वांना मिळून दोन लाख रुपये दवाखान्यात असतानाचा आणि औषधाचा खर्च मिळू शकणार आहे. हे विमा संरक्षण वर्षातून एकदाच वापरता येणार आहे. रुग्णवाहिकेसाठी तीन हजार रुपयांचा निधी मिळणार आहे.

निवासी मिळकतकर किंवा गलिच्छ वस्ती सेवाशुल्क भरणाऱ्या मिळकतधारकाला कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास पाच लाख रुपये, अवलंबून असणारे अपंग पाल्य, घटस्स्फोटित मुलगी, अविवाहित मुलगी किंवा मुलगा यांचा अपघाती मृत्यू झाल्यास पाच लाख रुपयांची विमा रक्कम मिळू शकेल. त्यासाठी वयाची अट राहणार नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.