Pune : पुणे शहराजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सेवा रस्ते तयार करण्यास प्राधान्य – मंत्री शंभूराज देसाई

एमपीसी न्यूज : पुणे (Pune) शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 च्या शहरालगतच्या मार्गावर पुणे महापालिकेच्या ताब्यात असणाऱ्या जागेवर सेवा रस्ते तयार करण्यासंदर्भात महापालिकेला सूचना दिल्या जातील”, अशी माहिती परिवहन मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य भीमराव तापकीर यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री देसाई बोलत होते. ते म्हणाले की, दरीपूल ते सिंहगड रोड पर्यंत डाव्या बाजूचा सेवा रस्ता बांधण्यात आलेला आहे. उजव्या बाजूस सिंहगड रोड ते इंद्रयणी शाळेपर्यंत सेवा रस्ता असून नऱ्हे स्मशानभूमीजवळ महामार्गाच्या बाजूने समांतर नाला असल्यामुळे महामार्गाच्या हद्दीत सेवा रस्ता होऊ शकत नाही. त्यामुळे या ठिकाणी नाल्याच्या बाजूने सुमारे तीन मीटर रुंदीची भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची जागा आणि उर्वरित पुणे महानगर पालिकेच्या हद्दीतील महाराष्ट्र प्रांतिक अधिनियम 1949 चे कलम २०५ नुसार आखावयाचा नियोजित 6 मीटर रूंदीचा रस्ता असे दोन्ही मिळून एक मीटर रुंदीच्या सेवा रस्त्याचे काम महानगरपालिकेमार्फत करण्याचे नियोजित केलेले आहे.

या कामासाठी पथ विभागामार्फत रु. 4.18 कोटी रकमेची निविदा मागविण्यात आली असून ती मान्यतेच्या प्रक्रियेत आहे. या मान्यतेनंतर राष्ट्रीय मार्ग रस्त्यालगत इंद्रायणी इंटरनॅशनल स्कूल ते नऱ्हे स्मशानभूमी दरम्यान नऊ मीटर रुंदीच्या सेवा रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यापुढील नऱ्हे स्मशानभूमी ते भूमकर चौक व नवले पुल ते कात्रज दरम्यानच्या भागातील सेवा रस्ते भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत करण्याचे नियोजन असल्याची माहिती मंत्री देसाई यांनी दिली.

पुणे महानगर पालिकेच्या हद्दीमध्ये 60 मीटर रुंदीचा (Pune) राष्ट्रीय महामार्ग सोडून त्याच्या लगत मंजूर विकास आराखड्यामध्ये दोन्ही बाजूस प्रत्येकी 12 मीटर रुंदीचे डी.पी. रस्ते वारजे ते वडगाव बु. ते आंबेगाव या भागापर्यंत दर्शविण्यात आलेले आहे. पुणे महानगर पालिकेच्या हद्दीमध्ये राष्ट्रीय महामार्ग लगतचे 12 मीटर रूंदीचे डी. पी. रस्ते संपूर्णतः विकसित झालेले नाही. तथापि, वारजे भागामध्ये ज्या ठिकाणी चटई क्षेत्र मोबदल्यामध्ये रस्त्याची जागा पुणे महानगर पालिकेच्या ताब्यात आलेली आहे, त्या ठिकाणी 12 मीटर रुंदीच्या राष्ट्रीय महामार्गा लगतचे सुमारे 3.5 कि.मी. लांबीच्या डी. पी. रस्त्याचे बांधकाम करण्यात आलेले आहे.

Shirur : तीन बिबटया बछड्यांची त्यांच्या आईशी भेट घडवण्यात वन विभागाला यश

त्याचप्रमाणे वडगाव बु. मध्ये सुमारे 1 कि.मी. लांबीचे 12 मीटर रूंदीच्या डी. पी. रस्त्याचे काम करण्यात आलेले आहे. आंबेगाव बु. या भागामध्ये 12 मीटर डी.पी. रस्त्याची जागा पुणे महानगर पालिकेच्या ताब्यात आली नसल्याने तेथे रस्ता विकसनाचे काम अद्याप झालेले नाही. मात्र या भागामध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याच्या 60 मीटर रूंदी अंतर्गत स्वंतत्र सेवा रस्त्याचे काम भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत सुरू असल्याची माहिती मंत्री देसाई यांनी दिली. या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत सदस्य राहुल कुल यांनी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.