BRT Road News : बीआरटी मधून होणारा खाजगी वाहनांचा प्रवास नागरिकांच्या जीवाशी; डॉक्टर महिलेने गमावला पाय

एमपीसी न्यूज – बीआरटी मधून खाजगी वाहन चालक परवानगी नसताना तशीच चालवतात. बर शिस्तीत चालवली तर ठीक पण बेदरकारपणे वाहने चालवली जातात. यामुळे रस्ता ओलांडणारे नागरिक, रस्त्याने पायी चालत जाणा-या नागरिकांच्या जीवाशी खेळ होतो.

रावेत येथे बीआरटी मार्गावरून भरधाव वेगात एक ट्रक भरधाव वेगात आला. बीआरटी मधून बाहेर पडल्यानंतर वळणावर ट्रकची एका डॉक्टर महिलेला धडक बसली. त्यात महिला डॉक्टर गंभीर जखमी झाली. पायाला गंभीर दुखापत झालेल्या डॉ. लीना बर्दम यांना आपला पाय गमवावा लागला. ही घटना मागील दोन महिन्यांपूर्वीची आहे.

मागील काही दिवसांपूर्वी बीआरटी मार्गावरून जाणा-या वाहनाच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत्यू झालेली व्यक्ती बीआरटी रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात आलेल्या वाहनाने पादचारी व्यक्तीला धडक दिली.

लग्न होऊन एक महिना झालेल्या तरुणाच्या जीवावर हा बीआरटी मधील प्रवास बेतला आहे. नववधू अवघ्या महिनाभरात विधवा झाली. पिंपरी येथे देखील बीआरटी मार्गावरून दुचाकी चालवणा-या दुचाकीस्वाराचा अपघात झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

बीआरटी मधून वाहन चालवणा-यांचे अपघात होतात, बीआरटी मधून वाहन चालवून नागरिकांना धडक दिल्यानेही अपघात होत आहे. धोका दोन्ही बाजूंनी तेवढाच आहे. विशेष म्हणजे बीआरटी मार्गावर अनेक ठिकाणी अटेंडंट नाहीत. पीएमपीएमएलने बीआरटी रस्त्यावरील सुरक्षेसाठी एका कंपनीला कंत्राट दिले आहे. संबंधित कंपनीला प्रत्येक महिन्याला याचे पैसे जमा होतात. मात्र कंपनी बीआरटी मार्गावर अनेक ठिकाणी अटेंडंट नेमण्यास टाळाटाळ करते.

सामाजिक कार्यकर्त्या प्राजक्ता रुद्रवार याबाबत बोलताना म्हणाल्या, “पीएमपीएमएल, महापालिका आणि पोलिसांनी याकडे लक्ष द्यायला हवे. बीआरटी रस्त्यांवर बूम बॅरीअर लावले जाणार असल्याचे सुरुवातीपासून सांगितले जात आहे. मात्र अजूनही त्यावर कार्यवाही झालेली नाही. बूम बॅरीअर लावले जातील तेंव्हा लावले जातील, पण तोपर्यंत नागरिकांच्या सुरक्षेची आणि बीआरटी मार्गावर अपघात होऊ नये यासाठी प्रशासनाने लक्ष द्यायला हवे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.