Pune : शरद पवार जातीचे राजकारण करतात- आढळराव पाटील

एमपीसी न्यूज- माझ्या पंधरा वर्षाच्या खासदारकीच्या काळात मी कोणाचीही जात काढली नाही. पण शरद पवार हे जातीचे राजकारण करतात. अशा शब्दात शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.

दरम्यान, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात शिवसेना-भाजपा-रिपाई महायुतीचे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लांडेवाडी ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जोरदार शक्तीप्रदर्शन करीत रॅली काढली. नरपितगिरी चौकात सभा घेण्यात आली.

  • यावेळी पुणे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल देसाई, शिवसेना नेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार बाबुराव पाचर्णे, आमदार महेश लांडगे, आमदार सुरेश गोरे तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर आढळराव पाटील यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना अनेक प्रश्नावर आपली भूमिका मांडली.

आढळराव पाटील म्हणाले, “मी प्रबोधनकार ठाकरे, बाळासाबाहेब ठाकरे, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी जातीपातीच्या राजकारणापासून दूर असून माझ्याकडून असे काही होणार नाही” मागील तीन निवडणुकापेक्षा यंदा सर्वाधिक मतांनी निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.