Pune Crime News : पोलीस कर्मचाऱ्याचा प्रताप, मदत करणाऱ्या पत्नीच्या मित्राला मारहाण करत डांबून ठेवले

एमपीसी न्यूज – पुणे पोलीस दलात काम करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने पत्नीला मदत करणाऱ्या तिच्या मित्राला मारहाण करत डांबून ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल काळे (रा. शिवाजीनगर पोलीस लाईन) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात अमृत जाधव (वय 37) यांनी तक्रार दिली आहे. हे तिघेही महाविद्यालयिन मित्र असल्याची माहिती समोर येत आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, विशाल काळे हे चतु:शृंगी पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. शिवाजीनगर येथील पोलीस लाईन वसाहतीत ते पत्नीसह राहतात. मागील काही दिवसांपासून त्यांच्या आणि पत्नीचे कौटुंबिक वाद आहेत. आणि अमृत जाधव हे पत्नीला मदत करत असल्याचे विशाल काळे यांना समजले होते.

याच रागातून विशाल काळे हे 15 जून रोजी अमृत जाधव राहत असलेल्या कसबा पेठेतील त्यांच्या घरी गेले. त्यानंतर घरांमध्ये जबरदस्तीने प्रवेश करत फिर्यादीचा मुलगा आणि त्यांना हाताने मारहाण करत शिवीगाळ केली. तसेच जाताना घराची कडी बाहेरून लावून घेत त्यांना घरात डांबून ठेवले. या सर्व प्रकारानंतर अमृत जाधव यांनी फरासखाना पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.