Pune Crime News : वानवडीतील पेट्रोल पंपावर दिवसाढवळ्या दरोडा, नऊ लाखाची रोकड लुटली

एमपीसी न्यूज : पुण्याच्या वानवडी येथील सय्यद नगर परिसरातील एका पेट्रोल पंपावर दिवसाढवळ्या दरोडा टाकून तब्बल आठ लाख 74 हजार रुपयांची रोख रक्कम लुटण्यात आली.

भरदिवसा ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पेट्रोल पंपावरील मॅनेजर बँकेत रोख रक्कम जमा करण्यासाठी जात असताना हा प्रकार घडला. वानवडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सय्यद नगर भागात हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल पंप आहे. फिर्यादी बाळासाहेब आंबुरे हा या पेट्रोल पंपावर मॅनेजर म्हणून काम करतो. शनिवार आणि रविवार या दोन दिवशी बँकेला सुट्टी असल्यामुळे या दोन दिवसाची रोख रक्कम घेऊन अंबुरे हा दुचाकीने बँकेत जमा करण्यासाठी निघाला होता. दरम्यान दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास वानवडीत एके ठिकाणी आरोपींनी त्यांना अडवले. त्यानंतर कोयत्याचा धाक दाखवून रोख रक्कम असलेली बॅग जबरदस्तीने चोरून नेली आहे.

हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. वानवडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.