Pune: 323 रस्ते रुंद करण्याच्या प्रस्तावाचा उद्या निर्णय, मुंबईत महत्वपूर्ण बैठक

Pune: Decision on proposal to widen 323 roads tomorrow, important meeting in Mumbai उपमुख्यमंत्री पवार यांनी महापालिकेच्या कारभारात आता लक्ष घातल्याने खमंग चर्चांना ऊत आला आहे

एमपीसी न्यूज- पुणे शहरातील 323 रस्ते रुंद करण्याचा प्रस्तावाचा मंगळवारी फैसला होणार आहे. मुंबईत मंत्रालयात नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांसोबत महत्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे. त्यामध्ये रस्त्यांच्या रुंदीकरणाबाबत निर्णय होणार आहे.

पुण्यातील सहा मीटर रस्ता नऊ मीटर करण्याचा स्थायी समितीचा मान्य केलेला प्रस्ताव अडचणीत आला आहे. महापालिकेच्या स्थायी समितीने रस्ते रुंदीकरण बाबत घेतलेला निर्णय नियमबाह्य असल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे.

त्यामुळे हा प्रस्ताव रद्द करण्यात यावा, अशी मागणी अजित पवार यांच्याकडे करण्यात आली. त्यानंतर पवार यांनी नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांसोबत बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेतला.

महापालिकेचा प्रस्ताव योग्य आहे का? महाराष्ट्र प्रादेशिक नगर नियोजन अधिनियमाच्या ३७ (१) अनुसार रस्ते रुंद करण्याची प्रक्रिया करावी का? याचाही निर्णय होणार आहे.

आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, मनसेचे गटनेते वसंत मोरे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

उपमुख्यमंत्री पवार यांनी महापालिकेच्या कारभारात आता लक्ष घातल्याने खमंग चर्चांना ऊत आला आहे. महापालिका प्रशासनाने जे 323 रस्ते रुंदीकरण करण्यासाठी निवडले आहेत. हे रस्ते प्रामुख्याने कोथरूड आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कोथरूडमधून विजयी झाले आहेत. त्यांचे वर्चस्व वाढू नये, यासाठी आता अजित पवारही सक्रिय झाले आहेत.

रस्ता रुंदीकरणावरून दोन दादा आमनेसामने येण्याची चिन्हे आहेत. तर, विरोधी पक्षांचा विरोध हा राजकीय असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांचे म्हणणे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.