Pune : झोपडपट्टी भागात रेशनचे धान्य घरपोच करण्याची जिल्हा प्रशासनाची सोय -जिल्‍हाधिकारी

एमपीसी न्यूज – झोपडपट्टी भागात धान्य व्दारपोहोच करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील झोपडपट्टयात एकूण 270 दुकानांमधून अन्नधान्य व्दारपोहोच करण्यात येणार आहे. प्रत्येक वस्तीत धान्यवाटपाचे निर्धारित वेळापत्रक ठरविले असून त्याप्रमाणे धान्य डिलिव्हरी करण्यापूर्वी कार्डधारकांना कळविण्‍यात येईल. कार्डधारकाच्या सोयीसाठी दुकानदारांना शासकीय अन्नधान्यासोबत इतर जीवनावश्यक वस्तू जसे डाळ, तेल, साखर, साबण, मीठ इत्यादी गोष्टी कार्डधारकांच्या मागणी व गरजेप्रमाणे विक्री करण्याची मुभा देण्यात आली आहे, असे जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले आहे.

जिल्‍हाधिकारी राम म्‍हणाले, 24 मार्च 2020 पासून कोरोनाचा (कोविड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर एप्रिल, मे व जून 2020 या तीन महिन्यांचे एकत्रित आगाऊ धान्य अंत्योदय अन्न योजना व अन्नसुरक्षा योजना रेशन कार्ड धारकांना पुरविण्यात येणार आहे. एप्रिल 2020 करिताचे 3 हजार 868.50 मेट्रिक टन गहू व 2 हजार 548 मेट्रिक टन तांदूळ स्वस्त धान्य दुकानामध्ये पोहोच करण्‍यात आलेला आहे. या धान्याचे वाटप रेशनकार्डवर 1 एप्रिल 2020 पासून सुरू करण्‍यात येत आहे.

मे व जून करिताचे धान्य 7 हजार 737 मेट्रिक टन गहू व 5 हजार 96 मेट्रिक टन तांदूळ स्वस्त धान्य दुकानदारांना 10 एप्रिल 2020 पासून पुरविण्याचे नियोजन असल्याचेही त्‍यांनी सांगितले. हे धान्य केवळ अंत्योदय व अन्नसुरक्षा योजना रेशनकार्डधारकांनाच वाटप करण्यात येणार असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

वरील कार्डधारकांना धान्य वाटप करण्याचे सविस्तर नियोजन करण्यात आले आहे. सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांनी कार्डधारकांना धान्य वाटप करण्‍यासाठी निर्धारित वेळापत्रक तयार केले आहे. एका निर्धारित वेळापत्रकामध्ये 10 कार्डधारक धान्य घेण्यासाठी येतील. सोशल डिस्टंसिंग करिता दुकानासमोर एक मीटर अंतर राखून मार्किंग करणेत आले आहे.

निर्धारित वेळापत्रकाप्रमाणे कार्डधारकांना दुकानदाराकडून दूरध्वनीवरुन बोलविण्‍यात येणार आहे. कार्डधारकांनी धान्य घेण्यासाठी गर्दी करु नये याकरीता आवश्यकता भासल्यास जरुर तेथे पोलीस बंदोबस्त पुरवण्‍याबाबत पोलीस आयुक्त, पुणे व पिंपरी चिंचवड यांना कळविण्यात आले आहे. जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी (ब्लॅक मार्केटिंग) रोखण्‍याकरीता परिमंडळनिहाय 11 पथकांव्दारे दररोज तपासणी करण्‍यात येत आहे. जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य, भाजीपाला, दूध व औषधे यांची सद्यस्थितीत एकूण 27 हजार 210 दुकाने सुरळीतपणे सुरु आहेत.

सर्वसामान्य लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासणार नाही, याकरीता मार्केट कमिटी, होलसेलर व्यापारी, किराणा भुसार असोसिएशन व्यापारी महासंघ यांच्‍याशी समन्वय ठेवण्‍यात येत असून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरळीत होईल, याची दक्षता घेण्यात येत आहे. काही जिल्हाबाह्य व राज्यबाह्य वाहतुकीने येणारी अन्नधान्य वाहने पोलीसांकडून अडविण्यात येत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. मात्र 92 गाडयांची सोमवारी (दि. 31) आवक झाली आहे.

लॉकडाऊन कालावधीत अत्यावश्यक सेवांकरीता पेट्रोल, डिझेल तुटवडा होऊ नये याकरिता पुढील कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवा व शासकीय वाहनांकरिता पेट्रोल व डिझेल साठा राखीव ठेवण्यात यावा, असे पेट्रोलियम कंपन्यास कळविण्‍यात येत आहे. अत्यावश्यक सेवांकरिता लागणा-या मनुष्यबळाला पुरवठा कार्यालयातर्फे ओळखपत्र देण्यात येत असून 4 हजार 96 ओळखपत्र विविध आस्थापनांना वितरित करण्‍यात आलेली आहेत.

शिवभोजन थाळीही मिळणार पार्सल
सद्यस्थितीत पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये एकूण 14 शिवभोजन केंद्रे सुरु असून या केंद्रावरुन शासन निर्देशाप्रमाणे फूड पॅकेट थाळी 5 रुपये या दराने विक्री सुरु आहे. सोशल डिस्टंसिंगची कठोरपणे अंमलबजावणी करण्‍याबाबत शिवभोजन केंद्रांना आदेश देण्‍यात आलेले आहेत. केंद्रचालकांना फूड पॅकेटव्दारे थाळी विक्री करण्‍यास परवानगी दिली असून गरीब, गरजू व्यक्तींच्या ठिकाणी जाऊन त्यांना थाळी विक्री करण्याची मुभा देण्यात आली असल्याची माहिती जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

  • रेशन कार्डधारकांनसाठी हेल्पलाईन :
    टोल फ्री क्रमांक 1077
    मदत केंद्र क्रमांक 020-26123743 (सकाळी 8.00 ते रात्री 8.00)
    मोबाईल क्रमांक 9405163924

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.