Pune : पुण्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही -अजित पवार

एमपीसी न्यूज – पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार  यांनी दिले. कोंढवा खुर्द येथील प्रभाग क्रमांक 26 येथील 4.5 किलोमीटर 500 मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी व श्री गुरुनानक देवजी उद्यानाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार चेतन तुपे, नगरसेविका नंदा लोणकर तसेच लोकप्रतिनिधी व महानगरपालिकेचे अधिकारी आदी उपस्थित होते.

यावेळी अजित पवार म्हणाले, उद्यानं ही शहरांची फुफ्फुसे आहेत. प्रदूषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनावर भर द्यायला हवा. त्याचबरोबर घनकचरा वर्गीकरण व विघटन करणे आवश्यक आहे. पुण्यातील नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा, अखंडित वीज, रिंग रोड, आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ आदींसाठी निधी देण्यात येत असून जागतिक दर्जाचा चित्रपट महोत्सव होण्यासाठी ही सहकार्य करण्यात येत आहे.

‘करोना’ च्या पार्श्वभूमीवर दक्षता घ्या करोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी सर्वांनी सामाजिक शिष्टाचार पाळणे गरजेचे आहे. शक्यतो गर्दीत जाणे टाळा, हस्तांदोलन करु नका, खोकताना व शिंकताना नाका-तोंडावर रुमाल धरा, अशी आवश्यक ती खबरदारी सर्वांनी बाळगा, असे कळकळीचे आवाहन त्यांनी सर्वांना केले. यावेळी महापौर मोहोळ, नगरसेविका नंदा लोणकर यांनी मनोगत व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.